मंगळवार, २८ जानेवारी, २०२५

ओ पी नय्यर - तुमसा नहीं देखा ( भाग 2 )

 आशा भोसले आणि ओ पी नय्यर ....


संगीत विश्वातील एक अत्यंत यशस्वी , एकमेकांना सर्वार्थाने पूरक ठरलेली जोडी ....
ओपींच्या “आईये मेहेरबान” ला आशाने आपल्या आवाजात प्रतिसाद दिला आणि ओपींना एक सोनसळी मखमली आवाज गवसला ... तर आपल्याच मोठ्या बहिणीच्या लता मंगेशकरच्या सावलीत झाकोळून गेलेल्या आशाच्या आवाजाला ओपींच्या स्वरुपात अत्माविशावासाची , नवचैतन्याची साथ मिळाली .....
"मैं शायद तुम्हारे लिये अजनबी हूँ
मगर चाँद तारे मुझे जानते है "
म्हणत आशाने जणू ओपींना आश्वासनच दिलं ....

ओपी आणि आशा म्हणजेच सुपर सुपर हिट गाणं असंच समीकरण झालं ....
त्या दोघांच्याच गाण्यांचं एक आगळं विश्व आहे .....
त्या विश्वाचे लाखो करोडो चाहते आहेत .....
आशाचा आवाज अतिशय व्हर्सटाइल आहे हे तर सगळेच जाणतात ......
पण ओपींकडे गाताना आशाचा आवाज जास्तच खास लागत असे ....

“ये क्या कर डाला तुने” अशी लाडिक कबुली
“बेईमान बालमा मान भी जा” मधलं गोड आर्जव
“आंखो से जो उतरी है दिल में” मधली धुंदी
“वो हसीन दर्द दे दो जिसे मैं गले लगा लू“ – मधली उत्कट विनंती
विरह , प्रेम , प्रणय , धुंदी , मादकता ह्या नेहेमीच्याच भावना ....
पण ओपीं साठी गाताना आशाच्या आवाजाला एक वेगळीच उंची प्राप्त होत असे .....
दोघांनी मिळून अनेक कलाकृतींचं सोनं केलं आहे .....

रागिणी मधलं किशोर कुमार आणि आशाने गायलेलं भन्नाट विनोदी
“मै बंगाली छोकरा” आणि
“चना जोर गरम बाबू” ही हलकीफुलकी विनोदी गीते ऐकल्यावर कळतं की प्रणयी गाण्यांप्रमाणेच मिश्कील खट्याळ गाणी हा सुद्धा ओपींचा forte होता .....
“अब तो जी होने लगा किसीकी नजर का सामना”
“चल दिये बंदा नवाझ“
“अच्छा जी माफ करदो थोडा इन्साफ करदो“
“हमदम मेरे खेल न जानो“
सारखी अनेक छेडछाड टाईप खोडकर गाणी ओपींनी आपल्या युनिक स्टाईल मध्ये बनवली ....

ओपींनी मोहम्मद रफीला सुद्धा एक से एक लाजवाब गाणी दिली ...
“जवानियाँ ये मस्त मस्त बिन पिये”
“हमदम मेरे मन भी जाओ”
“आपके हसीन रुख पे आज”
“न जाने क्यू हमारे दिलको तुने”

पण जेव्हा ह्याच रफी बरोबर बेबनाव झाला तेव्हा महेंद्र कपूरला घेऊन
“मेरा प्यार वो है के मरके”
“मेरी जान तुम पे सदके”
“आँखो में कयामत का काजल”
अशी बेहतरीन गाणी देऊन ती तितक्याच सहजतेने लोकप्रिय करून दाखवली .
लता ऐवजी आशा , रफी ऐवजी महेंद्र कपूरला घेऊन ओपींनी सिद्ध केलं की संगीताच्या दुनियेत कोणीही indispensable नसतं.
ओपींच्या रोमांटीक गीतांनी अनेक नवीन अभिनेत्यांची करीयर घडवली म्हटलं तर वावगं ठरणार नाही ....

‘मुझे देखकर आपका मुस्कुराना” आणि
“दिल कि आवाज भी सुन” मधला जॉय मुखर्जी ....
“पुकारता चला हुँ मै” आणि “लाखो है यहा दिलवाले” मधला विश्वजीत ....
“ ये चाँद सा रोशन चेहरा” आणि “कहीं न कहीं दिल लगाना पडेगा” मधला एव्हर ग्रीन शम्मी कपूर ....
या सर्वांची चोकॉलेट हिरोची इमेज बनविण्यात ओपींचा फार मोठा वाटा आहे .
“मै सोया अँखिया मिचे” आणि
“एक परदेशी मेरा दिल ले गया”
म्हणायला लावून भारत भूषणला देखील ओपींनी कधी नव्हे ते तरुण बनवलं ....

ओपींच्या संगीतातून कोवळं उत्साही तारुण्य झळकायचं म्हणूनच
“आपके हसीन रुख पे आज नया नूर है” म्हणताना अगदी रांगडा धर्मेंद्र देखील हळवा दिसतो .....
धीरगंभीर भावूक भूमिकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गुरु दत्तलाही
“ऐ जी दिल पर हुआ ऐसा जादू” ,
“मै खो गया यही कही”
“सुन सुन सुन सुन जालीमा” सारखी उडत्या चालीची बहारदार गाणी ओपींनी दिली ....
“जाने कहा मेरा जिगर गया जी”
“सुनो सुनो मिस चटर्जी”
“मै बंबई का बाबू” अशी विनोदी गाणी मिळूनही जॉनी वॉकर हिरो मटेरियल वाटतो तो ओपींच्या खास स्टाईल मुळेच ....

ओपींची प्रणयी युगलगीते म्हणजे जणू प्राजक्ताची हळुवार पाखरण ..... चाफ्याचा घमघमणारा सुगंधी दरवळ .....
"सोने कि चिडीया" सारख्या गंभीर चित्रपटात देखील त्यांनी तलत मेहमूद आणि आशा भोसलेच्या आवाजातील
"सच बता तू मुझपे फिदा" आणि
"प्यार पर बस तो नही"
ही दोन अविस्मरणीय गाणी दिली .....
“उधर तुम हसीन हो इधर”
“उडे जब जब झुल्फे तेरी”
“ये मेरे हाथ में तेरा हाथ”
“नाजनी बडा रंगी है वादा तेरा”
“देखके तेरी नजर बेकरार हो गये”
अशी अगणित अवीट गोडीची युगल गीते ओपींनी दिली ....

अस वाचनात आलं की कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण न घेतलेल्या ओपींनी रागिणी चित्रपटात
“मन मोरा बावरा” आणि “छोटासा बालमा” ही दोन अप्रतिम गाणी तिलंग रागात बांधली आहेत ....
तसच "फागुन" चित्रपटातील सर्वच्या सर्व गाणी त्यांनी पिलू रागात बांधली ... यातील
“एक परदेसी मेरा दिल ले गया"
"तुम रूठ के मत जाना"
"जानु जानु रे काहे खनके है"
"मैं सोया अँखिया मिचे"
ही गीते आजही लोकप्रिय आहेत.

ओपींच्या गाण्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिध्द घोड्यांच्या टापांचा ठेका .....
“बंदा परवर थाम लो जिगर”
“माँग के साथ तुम्हारा”
“पिया पिया पिया मोरा जिया पुकारे”
“यु तो हमने लाख हंसी देखे है”
“जरा हौले हौले चलो मोरे साजना”

पण म्हणून ओपींनी गंभीर , अर्थपूर्ण संगीत बनवलेच नाही असे नाही ....
“वो हँस के मिले हमसे हम प्यार समझ बैठे”
“है दुनिया उसीकी जमाना उसीका”
“आना है तो आ राह में”
“तुकडे है मेरे दिल के”
ही दर्दभरी गाणी ऐकताना त्याची खात्री पटते.

“थोडासा दिल लगा कर देख” मुसाफिरखाना चित्रपटातल्या रफी आणि शमशादच्या ह्या युगल गीतात रफीच्या आवाजाचा वापर वाद्या सारखा कलात्मकतेने करणारे ओपी बहुतेक एकमेव संगीतकार असतील ....

आयुष्यभर ओ पी नय्यर स्वतःच्या मतांशी प्रामाणिक राहिले ....
त्यांची मत बरोबर होती की नाही हे ठरवायची आपली योग्यता नाही .
पण एवढं मात्र खरं की त्यांनी कधीच आपल्या तत्वांशी समझोता केला नाही .
ज्यांच्याशी पटलं त्यांना बरोबर घेऊन आणि ज्यांच्याशी नाही पटलं त्यांना सोडून ओपी पुढे जात राहिले ....

उघडपणे कोणाही समोर त्यांनी कधीच हार मानली नाही .
पण त्यांच्या याच हट्टी स्वभावामुळे शेवटी शेवटी मात्र ते एकटे पडले
“चल अकेला चल अकेला चल अकेला
तेरा मेला पीछे छुटा राही चल अकेला”
ह्या गाण्याला चाल लावताना ओपींच्या मनात असंच काही आलं असेल का ?

अगदी ज्या आशा बरोबर ओपींचे मनापासून सूर जुळले होते तिच्यासामोरही ते शेवटपर्यंत नमले नाहीत . पण आशा बरोबरच्या बेबनावा नंतर ओपीच्या संगीतातील जादू निघून गेली हे सत्य मात्र कोणीही नाकारू शकत नाही .

"तुम रूठ के मत जाना
मुझसे क्या शिकवा
दिवाना हुं दिवाना" ....
असं मनातल्या मनात म्हणत ओपींनी आशाला विनवलं असेल का ?

की मग त्याचं दोघांचं शेवटचं गाणं असलेल्या
"चैन से हमको कभी आपने जीने ना दिया
जहर भी चाहा अगर
पीना तो पीने ना दिया" ....
मधुन ओपीनी आपलीच तक्रार मांडली ?

ह्या गाण्याविषयी एक किस्सा आहे – आशा आणि ओ पी नय्यर मध्ये झालेल्या बेबनावा मुळे हे गाणे आशा भोसलेने चित्रपटात घालू दिलं नाही ...
आणि तरीही त्या गाण्यासाठी आशाला १९७५ सालचा सर्वोत्कृष्ट गायिकेचे फिल्मफेयर पुरस्कार मिळाला ...
आशा भोसलेंनी पुरस्कार स्विकारायला नकार दिला ...

हे कळल्यावर ओपी स्वतः तो पुरस्कार स्विकारायला गेले आणि येताना वाटेत गाडी थांबवून तो पुरस्कार त्यांनी समुद्रात फेकून दिला ...
असे होते ओ पी नय्यर ..... अत्यंत मानी आणि मनस्वी .....
आणि म्हणूनच अनेक घाव सोसूनही कुणाही समोर न झुकणारे ....
बहुतेक नया दौर चित्रपटातलं
“दिल लेके दगा देंगे
यार है मतलब के
ये देंगे तो क्या देंगे“
यातलं वास्तव त्यांनी फार पूर्वीच जाणलं असावं ...

ज्या संगीत क्षेत्रात कोणत्याही गोष्टीला लता मंगेशकर ह्या नावाशिवाय पूर्णताच येत नाही त्याच क्षेत्रात ओपींनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत लताच्या भरभक्कम स्वराच्या आधारा शिवाय आपली गुढी नुसतीच रोवली नाही तर जवळ जवळ ३ दशके उत्कृष्ट संगीत देऊन ती गुढी दिमाखाने मिरवली देखील .

हे असे धाडस फक्त ओ पी नय्यर हे एकमेव संगीतकारच करू शकले .....
आणि म्हणूनच ह्या निधड्या छातीच्या संगीतकाराला
“यु तो हमने लाख हंसी देखे है
तुमसा नाही देखा”
असा मानाच कुर्निसात करावसा वाटतो .....


© नयना पिकळे

ओ पी नय्यर - "तुमसा नही देखा" (भाग 1)

 ओ पी नय्यर ...

प्रणयी , मदमस्त , मधाळ गीतांचे बादशाह ...

त्यांच्या बद्दल प्रत्येक सच्च्या संगीतप्रेमीच्या तोंडून
“बहुत शुक्रिया बड़ी मेहरबानी
मेरी ज़िन्दगी में हुज़ूर आप आए” …….
हेच शब्द बाहेर येतील यात शंकाच नाही .
जर त्यांची गाणी नसती तर एक अख्खी तरुण पिढी विराण निरस आयुष्य जगली असती .
त्यांच्या गीतांतून प्रणय ओसंडून वाहत असे .

“बलमा खुली हवा में” मधला धुंद मदहोश करणारा प्रणय
“जाईये आप कहाँ जओगे” हुस्न ने इश्क़ला दिलेलं खुल आव्हान
“रेशमी सलवार कुरता जाली का” मधली खट्याळ नोकझोक आणि
“हुवे हैं तुमपे आशिक़ हम” अशी दिलखुलास कबुली
“सर पर टोपी लाल हाथ में रेशम का रुमाल” रफीच्या रंगेल रांगड्या आवाजातील मनाला लोभवणारा मिश्कील खोडकर प्रणय
ही सारी गाणी आठवली की जख्ख म्हाताऱ्यांमध्येही जोश येतो .....

त्यांच्या गीतांमध्ये पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा लाजवाब मिलाफ आणि पंजाबी लोकगीताची झलक होती .....
ओ पी नय्यर म्हटलं की डोळ्यापुढे येतो सहा फुट चार इंच अशी ताडमाड उंची असलेला ताठ कण्याचा , गाजरासारख्या लालबुंद चेहऱ्याचा , बेदरकार वृत्ती दर्शवणाऱ्या निळसर डोळ्यांचा संगीतकार ....
बराचसा आडमुठा स्वभाव , स्पष्टवक्तेपणा आणि तरीही स्वतःच्या सामर्थ्यावर असलेला सार्थ विश्वास .

लता सारख्या गानसम्राज्ञीशी झालेला बेबनाव असो , मोहम्मद रफी सारख्या सूरसम्राटा बरोबरचा वाद असो की साहीर सारख्या शब्दप्रभूशी न जुळलेले सूर .
ओपींचे कधीच कोणावाचून अडले नाही .
ते प्रत्येक वेळी एकटेच पुढे जात राहिले आणि मुख्य म्हणजे यशस्वी होत गेले .

"बदल जाये अगर माली
चमन होता नहीं खाली
बहारें फिर भी आती हैं
बहारें फिर भी आयेंगी"
"बहारे फिर भी आयेंगी" चित्रपटातील या ओळी संगीताच्या दुनियेत जर कोणी खर्या अर्थाने सार्थ केल्या असतील तर ते होते संगीतकार ओ पी नय्यर ….

ओ पी नैय्यर .... ओम्कारप्रसाद नय्यर ....
१६ जानेवारी १९२६ रोजी लाहोर येथे त्यांचा जन्म झाला ...
संपूर्ण घराणं उच्चशिक्षित असूनही छोट्या ओम्कारचं मात्र मन लाहोरच्या हीरामंडी मधल्या गायिकांची गाणी ऐकण्यात रमायचं ....
तिथलं वातावरण त्याला मोहात पाडायचं ...
घुंगरांची रुणझुण , सतार सारंगीचे सूर त्याच्या कानात २४ तास घुमायचे ...

त्याच्या जन्माच्या वेळी म्हणे त्याच्या आईला हर्मोनिम ऐकण्याचे , वाजविण्याचे कडक डोहाळे लागले होते ....
लाहोर मधल्या नय्यरांच्या कर्मठ सनातनी घरात आईला बाजा शिकवायला मास्टरजी येऊ लागले ...
म्हणजेच जन्मा आधीच ओपींवर संगीतसुरांचे गर्भसंस्कार झाले होते तर .

वयाच्या दहाव्या वर्षापासूनच लाहोर रेडीयो केंद्रावर ते गझल गायचे .
न्यू थियेटर्सच्या संगीताचा ओपींवर जबरदस्त प्रभाव होता ....
न्यू थियेटर्सचे आर सी बोराल , के एल सैगल, पंकज मलिक , कानन देवी ही त्यांची दैवते होती ...
ओ पीं च्या अनेक गाण्यात ऐकायला मिळणाऱ्या घोड्यांच्या टापांचा स्रोत
“चले पवन की चाल”
हे पंकज मलिक यांनी गायलेलं व संगीत दिलेलं गाणं आहे असं खुद्द ओपींनीच अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंं आहे ....

१९५२ सालचा ''आसमान" ओपींनी संगीत दिलेला पहिला चित्रपट ... यातलं
“देखो जादूभरे मोरे नैन”
हे गीता दत्तने गायलेलं गाणं आजही रसिकांना भुरळ घालतं .
पण हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आणि त्या नंतरचे “छम छमा छम” आणि “बाज” हे चित्रपटही चालले नाहीत .
“छम छमा छम” मध्ये गीता दत्तची
“जरा सामने आ जरा आँख मिला”
आणि
“ऐ दिल ऐ दिवाने”
ही गाजलेली गाणी होती .
पण हा चित्रपटही सणसणीत आपटला आणि ओपी निराश होऊन आपला बाडबिस्तरा गुंडाळून लाहोरला परत जायच्या तयारीला लागले .

आणि अशातच आला गुरु दत्तचा “आरपार” .....
आणि चंदेरी दुनियेत अवतरला सुरांच्या जादुनगरीतून आलेला एक जादुगार .....
सर्वांसाठी कधीही न आटणारा प्रेमाचा , मस्तीचा खळाळता झरा घेऊन ....
“लेके पहला पहला प्यार भरके आँखो में करार
जादू नगरी से आया है कोई जादुगर”
पुढील तीन दशके रसिकांना आपल्या जादूच्या पोतडीतून अनेक लाजवाब चाली ऐकवून त्याने विस्मित करून सोडलं ....
"आरपार " ......
ओपींच्या यशस्वी चित्रपट कारकिर्दीच्या शिडीची पहिली भक्कम पायरी ...
यातलं एकूणएक गाणं प्रचंड गाजलं .....

आरपार म्हटलं की शमशादच्या ठसकेबाज आवजातलं
“कभी आर कभी पार लागा तीरे नजर” कानात घुमू लागतं .
रफी आणि गीता दत्तचे
“सुन सुन सुन सुन जालीमा”
हे खोडकर गाणं कैक वर्ष मागे कॉलेजच्या तरुणाईच्या दिवसात घेऊन जातं .
“सुन सुन सुन सुन जालीमा” ह्या गाण्याचं गीताने गायलेलं विरही वर्जन देखील तेवढंच परिणामकारक , हृदयद्रावक ...
“अर्रे ना ना ना ना तोबा तोबा” हे धम्माल विनोदी गाणं मनमुराद हसवतं
तर “ये लो मै हारी पिया”
मधली प्रेमात सपशेल हार मानणारी गीता दत्तची लाडिक कबुली ऐकणाऱ्याचं हृदय जिंकते ....
आणि ह्या सर्वांवर कळस म्हणजे हळुहळु नशा आणणारी गीताच्या मादक आवाजातील
“हुँ अभी मै जवाँ ऐ दिल” आणि
“बाबूजी धीरे चलना प्यार में जरा संभलना”
ही दोन मदमस्त क्लब साॅन्ग्स ....
गीता आपल्या मादक स्वरात
“प्यार में जरा संभलना” .... म्हणत सावधानतेचा इशारा देते खरा , पण तोवर रसिकांवर गाण्यांची अशी काही नशा चढलेली असते की तिचे सगळेच इशारे बेदखल केले जातात .
गम्मत म्हणजे “बाबूजी धीरे चलना” असं लोकांना सांगणाऱ्या ओपीच्या नशिबाची घोडदौड मात्र “आरपार“ चित्रपटापासूनच भरधाव वेगात सुरु झाली ....

Mr & Mrs 55 , C I D , तुमसा नही देखा , नया दौर , हावडा ब्रिज , एक मुसाफिर एक हसीना , काश्मीर कि कली , मेरे सनम .......
हे व असे अनेक यशस्वी चित्रपट ओ पी नय्यर एकामागून एक देत गेले आणि रसिकांना काय घेऊ आणि काय नको असं झालं ......
आणि मग या जादुगाराने अंथरलेल्या स्वरसुमनांच्या गालिच्यावर बसून संगीतरसिकांची अत्यंत रम्य देखण्या श्रवणीय स्वरनगरीची अद्भुत सफर सुरू झाली .

कधी तिथे “दिवाना हुवा बादल” म्हणत हळुवार प्रेमाची पाखरण होत असे
तर कधी “आओ हुजूर तुमको सितारो में ले चलु” म्हणत थेट चंद्र ताऱ्यांच्या दुनियेत प्रवेश मिळे
कधी “पुछो न हमे हम उन के लिये” म्हणत भावूक केलं जाई
तर कधी “ देखो कसम से देखो कसम से” म्हणत खोड्या काढल्या जात असत
एकीकडे “कजरा मोहोब्बत वाला” ह्या ठसकेबाज कव्वालीचे स्वर कानी पडत

तर दुसरीकडे
“उडे जब जब जुल्फे तेरी” हे ठेकेदार भांगडा नृत्य पाहायला मिळायचं
“मुहब्बत करलो जी भरलो” ऐकून हसु यायचं
तर तेवढ्यात “कभी हमारी मुहब्बत का इम्तिहान तो लो” ऐकून डोळे भरून येत असत
मधूनच “मन मोरा बावरा” हे अफलातून क्लासिकल गाणं देखील ऐकू येई .
अशी बहारदार स्वरसुमनांची उधळण पाहून श्रोते मुग्ध होत असत .

ओपींची गाणी म्हणजे ऐकणाऱ्याला चिंब करून सोडणारा उत्साहाचा आनंदाचा अखंड जोशीला धबधबाच .
ओ पी नय्यर यांनी आपल्या संगीतात शमशाद बेगम , गीता दत्त आणि आशा भोसले यांच्या आवाजाचा सर्वात जास्त वापर केला …

आता हेच पहा ना ....
“लेके पहला पहला प्यार” आणि
“कभी आर कभी पार” मधला शमशादचा धीटपणा ....
“कही पे निगाहे कही पे निशाना” मधला अनोख्या अंदाजात दिलेला सावधानतेचा इशारा
“बुझ मेरा क्या नाम रे” मधला आगळा गोडवा
“जरा प्यार करले बाबू” असा गोड सल्ला कोण बरं नाकारेल ?
“मै जान गयी तोहे सैय्या” मध्ये तर शमशादने सैंय्याला चांगलीच ताकीद दिलिये आणि
“सैय्या तेरी अन्खियो में दिल खो गया” मध्ये सरळ सरळ त्याच सैंय्यावर भाळली आहे ...
ओ पीं नी शमशादला दिलेली ही सगळी गाणी हलक्या फुलक्या मूड मधली तिच्या खणखणीत आवाजाला साजेशी अशीच होती .
ओ पीं च्या संगीतात शमशादच्या आवाजाने आणखीनच मुक्त भरारी घेतली .

जिथे जिथे ओ पीं ना आपल्या संगीतात मादकता , मदहोशी हवी असायची तिथे त्यांना गीता दत्तच्या नशिल्या आवाजाने पुरेपूर न्याय दिला .
“हुँ अभी मै जवाँ” मधली नशीली साद
“थंडी हवा काली घटा” मधला मधाळ गोडवा
“जाता कहाँ है दिवाने” मधलं धीट आव्हान
“रात नशीली रंगरंगीली मस्त हवा” मधलं रंगीलं आमंत्रण आणि
“प्रीतम आन मिलो” ह्यात तर गीताचा आर्त स्वर काळजाचा ठाव घेतो
“मेरा नाम चीन चीन चू” मधला खोडकर नखरेलपणा अनुभवायला आणि
“कैसा जादू बलम तुने डारा”
मधल्या मदहोश करणाऱ्या नशेसाठी गीता दत्तच्या खट्याळ , मादक आवाजाला पर्याय नाही असं नाही का वाटत तुम्हाला ?

© नयना पिकळे
(क्रमशः)

🌸🌺🌹 बसंत है आया रंगीला 🌷🌻🥀

  कडाक्याच्या थंडीत डोक्यापर्यंत पांघरूण घेऊन झोपलं असताना अचानक एके दिवशी पाहटे कोकिळेची कुहूकुहू ऐकून जाग येते आणि एका क्षणात मनावरची मरगळ...