सोमवार, १७ जून, २०२४

"अजीब दास्ताँ है ये"

 आपल्याला आवडणार्या प्रत्येक गाण्याच्या आवडीमागे अनेक कारणं असतात. कधी शब्द, कधी संगीत, तर कधी आवडता नायक, नायिका, किंवा गायक गायिका वगैरे वगैरे …..

आणि त्यातूनही काही गाणी तर इतकी आवडीची असतात की त्यातील शब्द, संगीत, वाद्य, आवाज, नायक नायिकेचे हावभाव, त्यांच्या प्रतिक्रिया, गाणं कुठे कसं चित्रित झालंय ह्यासकट मनात कायमचं घर करून बसतात.
आज अशाच एका गाण्याबद्दल लिहीणार आहे …. गाणं आहे आपल्या सर्वांच्याच आवडीचं ….. "अजीब दास्ताँ है ये" ….

खरंतर आपलं आयुष्य म्हणजेच एक दास्ताँ आहे. आणि वास्तव आयुष्यातील घटना अनेकदा कल्पनेपेक्षा अजब असतात हेही तितकंच सत्य आहे . ह्या प्रवासात कुठवर जायच आहे आणि कुठे ठहराव कुठे येईल हे कुणालाही आजवर कळलेलं नाही .

"अजीब दास्ताँ है ये
कहाँ शुरू कहाँ खतम
ये मंज़िलें है कौन सी
न वो समझ सके न हम”

प्रेम कोणाचं, कुणावर, कसं आणि कधी जडतं ह्याचे तर कोणतेही नियम नसतात.
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात . प्रकाश सर्वांनाच दिसतो. प्रकाशात अनेकांचं आयुष्य उजळून निघतं पण ज्यांच्या नशीबात त्या प्रकाशा मागचा अंधार असतो त्यांचं काय ?
नायिकेच्या भविष्यातही असंच काहीसं आहे. आजवर प्रकाशात उजळून निघायची स्वप्न पाहणार्या तिला प्रत्यक्षात मात्र प्रकाशाच्या दुसरी बाजूचं स्थान मिळालेलं आहे ….

"यत्र वह्नी तत्र धूमः" ह्या न्यायानुसार जिथे आग तिथे धूर असतोच. त्या आगीमुळे निर्माण झालेला प्रकाश तिच्या नशीबात नाही तर तिच्या वाट्याला आला आहे धूर आणि त्या धूरामुळे ती गुदमरत आहे … त्या धगीची झळ बसून तिचं हृदय पोळून निघत आहे .
आज ती स्वप्नातून सत्यात आली आहे . पण बिचारीची असहाय्यता पाहा की हे सत्य सुद्धा स्वप्नच असावं म्हणून ती मनोमन करूणा भाकत आहे . सत्याला सामोरं जाण्यासाठी स्वतःच्याच मनाला कसंबसं तयार करते आहे.

"ये रोशनी के साथ क्यूं
धुआँ उठा चिराग से
ये ख़्वाब देखती हूँ मैं
के जग पड़ी हूँ ख़्वाब से"...

तसं पाहायचं तर नायकालाही नायिकेच्या आपल्यावरच्या प्रेमाची अंधूक का होईना चाहुल लागलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही . पण दोघांपैकी कोणीही अजून तशी कबूली दिली नव्हती.
अशातच नायकाचे लग्न कोणा दुसरीशीच ठरते. आणि म्हणूनच नायिकेची तडफड होत आहे .
त्यात भर म्हणून की काय नायकाचे अभिनंदन करायची जबाबदारी नायिकेलाच सर्वांसमोर पार पाडायची आहे.
आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती जेव्हा दुसर्या कोणाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनणार असल्याचं कळतं तेव्हा काय करावं ? आपलं आयुष्य उध्वस्त झालं म्हणून दुःख करावं की त्याचं आयुष्य नव्याने सुरू होणार म्हणून आनंद साजरा करावा ?
कसं वाटत असेल अशावेळी ? आत खळबळ माजलेली असताना वरकरणी शांत राहाणं किती अवघड आहे.

“मुबारकें तुम्हें के तुम
किसीके नूर हो गए
किसीके इतने पास हो
के सबसे दूर हो गए” …..

तिचं आयुष्य उजळवून टाकणारा तो आता दुसर्याच कुणाच्या तरी आयुष्यात प्रकाश बनून जाणार आहे. आणि तिच्या आयुष्यात मात्र कायमचा काळाकुट्ट काळोखच उरणार आहे .
नायकाला ह्यामुळे काही फरक पडेल किंवा नाही हेही नायिकेला माहीत नाहिये. कदाचित तो त्याच्या त्या नवीन सुंदर जगात कायमचा रमूनही जाईल .
पण नायिकेचं मात्र अवघं आयुष्य त्याने व्यापून टाकलेलं आहे. त्याच्या शिवायचं स्वतःचं अस्तित्वही तिला नकोसं वाटत आहे. आपलं पुढचं सारं आयुष्य एकट्याने घालवताना ही आजच्या कातरवेळची आठवण तिच्या मनात कायम ताजी राहणार आहे

“किसीका प्यार लेके तुम
नया जहाँ बसाओगे
ये शाम जब भी आएगी
तुम हमको याद आओगे”...

संपूर्ण गाण्यात मीनाकुमारीच्या डोळ्यांमधील वेदना, ओठांवर उसने हसू आणत मनातली कालवाकालव लपवणे, हाताच्या बोटांतून जाणवणारी अस्वस्थता ह्या सर्वातून तिच्या मनातली घालमेल अतिशय अचूक रित्या व्यक्त झाली आहे.

हा दर्द गहीरा करणारा लताचा आवाज आणि तो दर्द पडद्यावर साकारणारी साक्षात ट्रॅजेडी क्वीन …. आज इतक्या वर्षांनंतरही सारं काही तितकच चटका लावतं.

लताचा आवाज आणि मीना कुमारीचा अभिनय ह्या दुग्धशर्करा योगामुळे अजरामर झालेले “दिल अपना और प्रीत पराई” ह्या १९६० सालच्या चित्रपटातील हे एक अविस्मरणीय गीत.

ह्या गाण्यातील आणखी एक कायम लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे साईड अॅक्ट्रेस शम्मीचा तो “माझ्यापासून काहीच लपलेलं नाही” हे सांगणारा तिरकस खट्याळ कटाक्ष.

गाण्याच्या सुरूवातीचे, अंतर्याच्या मधले आणि शेवटच्या कडव्यावेळचे संगीत अतिशय सुरेख. गाण्यात केलेला कोरसचा वापर तर लाजवाब. एकाच वेळी आनंदी सूर असलेला आणि तरीही हुरहुर लावणारा असा हा विलक्षण कोरस कायमचा लक्षात राहतो. सोबत पाश्चात्य पद्धतीने केलेला गीटारचा वापरही अप्रतिम.


© नयना पिकळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

🌸🌺🌹 बसंत है आया रंगीला 🌷🌻🥀

  कडाक्याच्या थंडीत डोक्यापर्यंत पांघरूण घेऊन झोपलं असताना अचानक एके दिवशी पाहटे कोकिळेची कुहूकुहू ऐकून जाग येते आणि एका क्षणात मनावरची मरगळ...