मीना कुमारीवर चित्रीत "अर्धांगिनी" (१९५९) चित्रपटातलं हे एक अतिशय सुरेख गाणं . मीना कुमारी ट्रॅजेडी क्वीन म्हणून लोकप्रिय होण्या आधीच्या काही चित्रपटांमध्ये ती अशा अवखळ, खोडकर भूमिकांमध्ये पाहायला मिळते.
पोस्टमनने नुकतंच एक पत्र आणून मीनाकुमारीच्या हातात दिलं आहे आणि पत्रावरचं नाव पाहूनच तीचा चेहरा आनंदाने असा काही उजळला आहे की विचारू नका…. हा उजळलेला चेहराच पत्र कुणाचं असेल हे सांगायचं काम करतो ….
गाण्याच्या सुरूवातीला लताने घेतलेले मोहक आलाप मीनाकुमारीच्या मनाची उल्हसित अवस्था दाखवायला पुरेसे आहेत.
खरंतर पत्र अजून हातातंच आहे, ते उघडलंही नाहीये की आतला मजकूरही वाचलेला नाहीये . तरीही आतल्या संदेशाच्या शक्यतेनेच तीला प्रचंड आनंद झाला आहे. इतकी की तीचा तिच्या पावलांवर ताबाच उरला नाहीये. बघा नं तीची पावलं कशी लटपटताहेत…
"तेरा खत ले के सनम
पाँव कहीं रखते हैं हम
कहीं पड़ते हैं कदम
कहीं पड़ते हैं कदम"
करायला जावं एक आणि व्हावं भलतंच असं तीचं झालंय. पण तेही हवंहवंसच आहे नाही का !
नाहीतरी प्रेमात पडलेल्यांचा कुठे कशावर ताबा असतो ?
प्रेमात पडलं की न बोललेलं सुद्धा ऐकू येतं, दृष्टीआड असणार्या गोष्टी सुद्धा लख्ख दिसतात …
असं असताना प्रत्यक्ष हातात असलेल्या पत्रात कोणतं रहस्य दडलेलं असणार ह्याचा अंदाज लावणं काही फारसं कठीण नक्कीच नाही .
मग भले पत्र अजून उघडलंच नसलं तरी काय झालं ?
एक मात्र खरं की आत लिहिलेल्या मजकूराच्या कल्पनेनेच तीचं हृदय विचलीत झालं आहे. मन सुद्धा थार्यावर नाही आणि नजरही सैरभैर झाली आहे.
ह्या नजरेला मात्र दटावून गप्प बसवावंच लागेल …. कारण पत्र उघडून वाचायला नजर तरी स्थीर हवी ना !!
"राज़ जो इस में छिपा है
वो समझता है दिल
कैसे खोले तेरा खत
हम से धड़कता है दिल
ए दिल ठहर ज़रा
नज़र ठहर ज़रा
होश में आ ले ज़रा हम
तेरा खत ले के सनम"
पत्राच्या स्पर्शानेच मीनाकुमारी मोहरून गेली आहे. पत्रातला त्याचा संदेश कातिलाना असणार ह्याची तीला पुरेपूर खात्री आहे.
इतकंच काय मगाशी सांगितल्याप्रमाणे तीचा सनम तिथे प्रत्यक्ष नसला तरी पत्र वाचताना त्याचा प्रेमळ आवाज तिच्या कानांना लडिवाळपणे स्पर्श करणार आहे जो ऐकायला ती आतूरलेली आहे …
पण हे सगळं तेव्हाच शक्य होणार जेव्हा तीचं धडधडणारं हृदय आणि भिरभिरणारी नजर ह्या सुखद धक्क्यातून सावरतील …. म्हणूनच ती म्हणते …
"इस में जो बात भी होगी
बड़ी क़ातिल होगी
तेरे आवाज़ भी इन
बातों में शामिल होगी
ए दिल ठहर ज़रा
ए नज़र ठहर ज़रा
सुने फिर तेरी सदा हम
तेरा खत ले के सनम"
गीतकार मजरूह सुलतानपुरींनी लिहिलेलं आणि संगीतकार वसंत देसाईंचं संगीत असलेलं "अर्धांगिनी" ह्या (१९५९) सालच्या चित्रपटातलं हे अतिशय सुरेल गीत . प्रियकराचं पत्र मिळाल्यावर प्रेयसीची होणारी अवस्था लताच्या उत्सुक आणि लाडिक आवाजातून अचूक व्यक्त झाली आहे. आणि लताच्या आवाजाला मीनाकुमारीने आपल्या अभिनयाने योग्य तो न्याय दिला आहे.
© नयना पिकळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा