कडाक्याच्या थंडीत डोक्यापर्यंत पांघरूण घेऊन झोपलं असताना अचानक एके दिवशी पाहटे कोकिळेची कुहूकुहू ऐकून जाग येते आणि एका क्षणात मनावरची मरगळ नाहीशी होते ...
मन हरखून जातं … वसंताच स्वागत करायला अधिरतेने तयार होतं आणि दबक्या पावलांनी येणार्या वसंताच्या खुणा जिथे तिथे शोधू लागतं .
नुसत्या वसंताच्या आगमनाच्या चाहुलीनेच अंगावर रोमांच फुलून येतो ....
आजूबाजूला पाहतो तो काय ! निसर्ग देखील आळोखे पिळोखे देत जागा होऊ लागलेला असतो . खिडकी समोरचा गुलमोहर बहरू लागलेला असतो .
जवळच एखाद्या आम्रवृक्षाचा मोहर आपल्या गोड दरवळाने वेडपिसं करू लागलेला असतो . पानगळी मुळे निष्पर्ण झालेले वृक्ष परत एकदा अंगभर इवल्या इवल्या लाल पिवळ्या पोपटी रंगांची पालवी मिरवायला लागलेले असतात . झाडे रंगीबेरंगी फुलांनी आसुसून बहरतात .
“ केतकी गुलाब जूही चम्पकबन फूले
रितु बसन्त अपनो कन्त , गोदी गरवा लगाय
झुलना में बैठ आज पी के संग झूले
केतकी गुलाब जूही चम्पकबन फूले ..... “
मऊ हिरवे सोनेरी वस्त्र ल्यायलेली वसुधा अबोध अल्लड युवतीप्रमाणे सजलेली असते. आसमंतात सगळीकडे फुला फळांचा मधुर दरवळ सुटतो .
त्या सुवासाने मदमस्त झालेले भुंगे आणि मधमाशा फुलाफुलांवर दाटी करतात. नाजूक साजूक रंगीबेरंगी फुलपाखरे इकडून तिकडे बागडू लागतात .
पाहावं तिथे लाल , गुलाबी , निळ्या , पिवळ्या रंगांची उधळण दिसते . कोकिळेला साथ द्यायला म्हणून इतर पक्षी देखील मंजुळ स्वरात किलबिलाट करू लागतात .
सगळेच वसंताचं जंगी स्वागत करायला सज्ज झालेले असतात .....
“ कुहु-कुहु बोले कोयलिया
कुंज-कुंज में भँवरे डोलें
गुन-गुन बोलें ...
सज सिंगार ऋतु आई बसंती
जैसे नार कोई हो रसवंती”
असा हा वसंत ....
अगदी प्राचीन काळापासून सर्वांचाच आवडता ऋतू आहे .
त्याच्या नुसत्या उल्लेखानेच अंग रोमांचित होत , तनामनातून एक गोड शिरशिरी धावू लागते .
“ झूम रहा है रोम रोम क्यूँ
तन मन लहराया
थिरक रहा है अंग अंग क्यो
कौन आज आया
राजन , कौन आज आया ... “
समस्त सृष्टी त्याच्या स्वागतासाठी नटून थटून तयार झालेली असते . सगळीकडे हर्षकल्लोळ माजलेला असतो ....
अशाप्रकारे अगदी राजेशाही थाटात पदार्पण करणाऱ्या वसंत ऋतूचा दिमाखच काही आगळा असतो ....
उगाचंच क्या त्याला ऋतुराज म्हटले आहे ?
सहाही ऋतूंचा अनभिषिक्त राजा .....
इतर सर्व राजा महाराजांची एका क्षणात सुट्टी करणारा ..... त्याच्या स्वागताला , त्याला रिझवायला नृत्य गायन हवेच .
“ राजन कौन , कौन महाराजन
कौन आज दुष्यंत
स्वागत करो आज आए हैं
श्री ऋतु राज बसंत
बसंत है आया रंगीला , बसंत है आया
मन की कोकिला लगी चहकने
आज साँस भी लगी महकने
मधुमदमाती अंग अंग में नया रंग छाया "
वसंतात फुलणाऱ्या प्रत्येक फुलाबरोबर , पाकळीबरोबर माणसाचे कोमल रसिक मन देखील उमलत जाते . वसंताच्या प्रभावामुळे धुंद मदमस्त होऊन गाऊ लागते .
उत्तम राजाची लक्षणे काय असावीत ?
आपली प्रजा आपल्यावर जेवढं प्रेम करते तितकीच प्रजेची काळजी त्यानेही घेतली पाहिजे .
म्हणूनच तर ज्या वसुंधरेने त्याला भेटायला एवढ्या उत्सुकतेने साज शृंगार केला आहे तिला हसवणं , तिचा साज कायम ठेवून तिचं सौंदर्य खुलवणं , तिच्यावर रसरंगाची बरसात करण हे वसंतराजाचं कर्तव्यच आहे .....
“ आला वसंत ऋतू आला , आला
वसुंधरेला हसवायाला सजवीत नटवीत लावण्याला
रसरंगाची करीत उधळण मधुगंधाची करीत शिंपण
चैतन्याच्या गुंफीत माला रसिकराज पातला”
वसंताची जादूच अशी न्यारी ....
वसंताची नुसती चाहूल लागताच वृक्ष लता टवटवीत होतात , फुले मधुर अमृताने भरून जातात . विरही जनांच्या हृदयावरील दुःखाचे सावट नाहीसे होते . कारण त्यांचे दुख जाणणारा , ते दूर करणारा त्यांचा सखा आता आलेला असतो .
“ व्याकूळ विरही युवयुवतींना
मधुर काल हा प्रेम मिलना
मदन सखा हा शिकवी रसिका शृंगाराची कला
आला वसंत ऋतू आला , आला”
वसंत ऋतू प्रेमीजनांना संकेत देतो कि आता तुमचा विरह काळ संपला . तुमच्या मिलनाचा काळ समीप आला आहे . हा संकेत मिळताच मन उत्तेजित होउन मिलनोत्सवाच्या तयारीला लागत .
या ऋतूराजाचे तीर सुद्धा मधाळ मोहक हवेहवेसे असतात . या तीरांनी घायाळ झालेलं कुणी चांदण्यात झोके घेण्यात गुंगून जातं , तर कोणी गगनातील तारे खुडून त्याचे गजरे बनवू लागतं .
“ ऋतू राजा ने तीर चलाया
जिया ललचाया सखी
आया बसंत , हुआ बिरहा का अंत
सखी आया बसंत .....
चंदा तले झूला डालो सखी
चलो तारों के गजरे बना लो सखी
झूला डालो सखी झूला डालो सखी
हठ छोड़ो नजरिया उठा लो सखी
बाँके बलमा को अपना बना लो सखी "
प्राचीन काळच्या कालिदास आणि बाणभट्ट पासून आजच्या ग दि माडगूळकरांपर्यंत वसंत ऋतूने सर्वांनाच भुरळ पाडली .
भारतात वसंत ऋतू माघातील शुक्ल पक्षातील पंचमी पासून सुरु होतो . अगदी प्राचीन काळापासून भारतात वसंतोत्सव साजरा केला जातो .
संस्कृत साहित्यातील अनेक काव्यात व नाटकात वसंत ऋतूचे देखणे वर्णन मिळते . पळसाच्या लालभडक फुलांना वसंतातील शृंगाराची उपमा दिली आहे .
भवभूती लिखित “मालती माधव” नुसार प्राचीनकाळी वसंतोत्सव साजरा करायला कामदेवाची पूजा केली जात असे . ह्या मदनोत्सवात स्त्री पुरुष एकत्र येऊन फुलांचे हार बनवत असत आणि एकमेकांवर अबीर कुमकुम उधळून नृत्य गायन करत असत .
" ऋतू संहार " ही विश्वविख्यात महाकवी कालिदासाची सर्वात पहिली रचना . सहाही ऋतूंचे अत्यंत काव्यात्मक वर्णन असलेल्या या काव्यात कालिदासाने वसंत ऋतुचे वर्णन सर्वात शेवटी केले आहे .
कारण मान देण्यासाठी इतर सर्वांनी हजेरी लावल्यावर राजा दरबारात सर्वात शेवटीच प्रवेश करतो . कालिदासाने वसंताला हातात प्रेमाचा धनुष्य घेतलेला योद्धा म्हटले आहे .कालिदासाच्या वसंत ऋतूत विलासप्रेमी मने आहेत , मधुगंध वाहणारा वारा आहे , चंदन आणि केशराने स्वतःला विभूषित करणाऱ्या विलासिनी आहेत , उन्मत्त भुंगे मधुभरल्या कुसुमाचे चुंबन घेत आहेत , वृक्षांवरील नवपल्ल्वांना वारा हळूहळू झुलवतो आहे . कालिदासाचा हा वसंत हृदयात एक खास जागा पटकावतो .....
बाणभट्टाने तर आपल्या “कादंबरी” मध्ये वसंत ऋतूचे अप्रतिम चित्र रेखाटून जी बहार आणली आहे त्याला साहित्यात इतरत्र कुठेही तुलना नाही .
वसंत ऋतूत विविध जातीच्या कमलपुष्पांमुळे शोभिवंत झालेले सरोवर , कामुकांना उत्तेजित करणारे आम्रमंजिऱ्यांचे नाजूक तुरे , मदिरा पिऊन मत्त झालेल्या कामिनींनी टाकलेल्या मद्याच्या चुळीच्या शिंपणीमुळे पुलकित होणारे बकुल वृक्ष , ललनांनी अशोक वृक्षावर लत्ताप्रहार केल्याने त्यांच्या पायातील रत्नजडित पैंजणांचे हवेत उमटलेले हजारो झंकार , भुंग्यांच्या काळ्याशार झुंडीमुळे काळ्या दिसणाऱ्या दारूहळदीच्या कळ्या , पुष्पपल्लवांच्या लतेत लपून फुलांमधील मधाचे फवारे आसमंतात उडवणाऱ्या कोकिळा , कामदेवाच्या पुष्पबाणाच्या अविरत वर्षावामुळे भर दिवसा मदनबाधा झाल्याने आपल्या प्रियकराला भेटायला लगबगीने संकेतस्थळी जाणाऱ्या अभिसारिका .
कादंबरीतील वसंत ऋतूच्या ह्या वर्णनामुळे प्रणयरसरंगाच्या सागराला उधाण आले आहे .
माडगुळकरांच्या मनातील वसंतही असाच आहे , प्रेमीजनांना एकत्र आणणारा .
जिथे वसंताच्या चाहुलीने पक्षी , प्राणी आणि वृक्ष देखील बहरतात तिथे मानवी हृदयाची काय कथा ? वसंताच्या साक्षीने मानवाच्याही आजवर मनातच राहिलेल्या अस्फुट प्रेमभावनांना कंठ फुटतो .
“ कोकीळ कुहू कुहू बोले
तू माझा तुझी मी झाले
ऋतुराजा तुझी वासंती
तरुतळी इथे एकांती
करकोमल देता हाती
चांदण्यात दिवसा न्हाले ”
वसंतात प्रेमाच्या खेळाला उधाण आलेलं असतं .....
अशा नशिल्या वातावरणात भान हरपून प्रेमी प्रणयाच्या खेळात धुंद झालेले असतात ......
वाऱ्याबरोबर उंचच उंच झोके घेणारे मन , नजरेतून डोकावणारी ती बहारदार रंगीत स्वप्ने , दोघांच्या हर्षभरित ताना आणि त्यांना साथ देणारे कोकीळ आणि मोर .
“ झूले में पवन के आई बहार
नैनों में नया रंग लाई बहार
प्यार छलके हो प्यार छलके .....
बादल झूम के आये गागर प्यार की लाये
कोयल कूकती जाये बन में मोर भी गाये
छेड़ें हम-तुम मल्हार प्यार छलके "
ही झाली प्रेमाच्या खेळात पारंगत असलेल्यांची स्थिती . पण त्यांचं काय जे नुकताच यौवनाचा उंबरठा ओलांडू पाहत आहेत ? आजवर ह्या अनोख्या प्रीतीच्या भावनेशी अनभिज्ञ होते ?
हृदयात वसंताच्या आगमनाने काहीतरी चलबिचल नक्कीच झाली पण ती का झाली ते काही उमगत नाही . ह्या विलक्षण हळुवार भावनेला नावही देता येत नाही .
ही काहीशी जाणती काही अजाणती स्थिती सुद्धा खूप गोड असते . ती शब्दात नाही सांगता येत , स्वत: अनुभवावी लागते .
“ आला वसंत देही मज ठावूकेच नाही
भीतीविना कशाचा देहावरी शहारा
हे उन भूषविते सोन्या परी शरीरा
का गुंफिली जरीने अभाळीची निळाई ....
ओठात थांबते का हासू उगाच माझे
बाहेर डोकविता का बोल आज लाजे
तो पोर कोकिळेचा रानात गीत गाई ....
हे आज काय झाले माझे मला कळेना
या नेणत्या जीवाला हे गुज आकळेना
ये गंध मोगर्याचा अली फुलून जाई ”
काही नवयौवना मात्र चाणाक्षपणे वसंताने दिलेले संकेत ओळखतात आणि आपला एकटेपणा घालवायला काल्पनिक का होइना पण त्याला साद घालतात .
“ देखोजी बहार आई, बाग़ों में खिली कलियाँ
आना है तो आजाओ, सूनी हैं मेरी गलियाँ ... “
प्रत्यक्ष मिलन शक्य नसलं तरी स्वप्नांवर तर कोणाचा पहारा नसतो ना ..... अगदी समाजाला , लोकलज्जेला घाबरणारा सामान्य माणूस सुद्धा स्वप्नात आपल्याला हवं ते मिळवूच शकतो की ....
“ दुनिया से जो डरते हो ख्वाबों में चले आओ
दो बोल मुहब्बत के तनहाई में कह जाओ
आजाओ मना लेंगे, सपनों में रंग-रलियाँ ....
हम दिल से तुम्हारे हैं ये कह भी नहीं सकते
और तुम से जुदा हो कर हम रह भी नहीं सकते
तुम बिन आशाओं की, कैसे खिली कलियाँ ....
आन हैं तो आजाओ, सूनी हैं मेरी गलियाँ
देखो जी बहार आई, बाग़ों में खिली कलियाँ .... “
कोणाचं तरी होऊन राहण्यात काय गम्मत असते आणि विरहातही कोणतं सुख मिळत हे वसंत ऋतुच आपल्याला शिकवतो .
असा हा वसंत ऋतू सर्वांच्याच हृदयात एक जबरदस्त ओढ निर्माण करतो . बावरलेल्या मनाला हिम्मत देतो आणि मन अगदी मुक्तपणे गाऊ लागतं .....
“ हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे .... “
© नयना पिकळे