“ ओ रे मांझी ओ रे मांझी ” .....
आवाज बराचसा खरखरीत , अनकन्वेशनल , सिनेपार्श्वगायकाच्या नॉर्मल व्याख्येत न बसणारा ....
तरीही खोल कुठेतरी मनाला स्पर्शून जाणारा ....
ऐकणाऱ्याला भुरळ घालायची जबरदस्त ताकद होती त्या आवाजात .......
पण तरी गाणं ऐकताना असंही वाटायचं की कोणी बरं अशा आवाजाच्या माणसाला हे गाणं म्हणायला दिलं असेल ?
माझ्या काकाला विचारल्यावर कळलं की ज्याने हे गीत गायलंय त्यानेच त्याला संगीतही दिलंय आणि त्यानेच
"हाल कैसा है जनाब का" आणि
“ अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना "
ह्या माझ्या आवडत्या गीतांनाही संगीत दिलंय ....
आणि मग काय ..
नेहेमीप्रमाणे एस डी बर्मन म्हणजेच सचिनदांची सगळी गाणी शोधून शोधून ऐकायचा छंदच जडला .....
सचिन देव बर्मन .... त्रिपुराचा राजकुमार ....
त्रिपुरा मधल्या कोमिल्ला नावाच्या गावी एका राजघराण्यात १ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांचा जन्म झाला .
आईवडील दोघेही संगीताचे चाहते .
वडील तर स्वतः उत्तम सतारवादक .
सचिनदांनी संगीताचे प्राथमिक धडे खुद्द वडिलांकडेच गिरवले ...
गायक मन्ना डे त्यांचे काका आणि स्वतः त्या काळचे प्रख्यात गायक असलेले के. सी. डे हे सचिनदांचे गुरु .
१९४४ साली संगीतात यशस्वी कारकीर्द करायचं स्वप्न उराशी बाळगून सचिनदा जेव्हा स्वप्ननगरी मुंबईत आले तेव्हा मुंबईची अवस्था नक्कीच
“ दिवाना मस्ताना हुआ दिल
जाने कहाँ होके बहार आयी ”
अशीच झाली असणार .
शिकार १९४६ ह्या चित्रपटात सचिनदांनी सर्वप्रथम संगीत दिलं . त्यातलं अशोक कुमारनेच म्हटलेलं
“ डोल रही है नैय्या मेरी “
हे गाणं त्याकाळी बऱ्यापैकी लोकप्रिय झालं .
गाण्याच्या सुरुवातीचा प्रदीर्घ म्युझिक पीस म्हणजे जिवंत निर्झरच जणू .
पण त्यांचं खऱ्या अर्थाने गाजलेलं पहीलं गाणं होतं दो भाई (१९४७) चित्रपटातलं गीता दत्तने म्हटलेलं
“ मेरा सुंदर सपना बित गया"
ह्या गीताने सचिनदा आणि गीता दोघांना एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आणलं .
त्यानंतर १९५० / १९५१ सालात आलेल्या अफसर , बाजी , जाल , सजा सर्वच चित्रपटांची गाणी प्रचंड गाजली ......
चारही चित्रपटात हिरो होता देव आनंद ......
तेव्हापासूनच देव आनंदची गाणी म्हणजे सचिनदांच संगीत हे समीकरण जणू ठरूनच गेलं .
चॉकलेट हिरो देव आनंदच्या रोमांटिक इमेजला साजेशी गाणी सचिनदांनी दिली आणि त्यांना साथ मिळाली उत्साही जोशीला आवाज असलेल्या किशोर कुमारची .
किशोरच्या यशात सचिनदांचा सिंहाचा वाटा आहे .
१९५०/६० मध्ये दुय्यम दर्जाची हलकी फुलकी विनोदी गाणी गाणाऱ्या किशोर कुमारचं सामर्थ्य सचिनदांनीच सर्वप्रथम ओळखलं .
सचिनदांनी किशोरला देव आनंदसाठी साठी १९५०-७० पर्यंत जवळ जवळ २ दशके गायला लावले .
देव , किशोर आणि सचिनदांनी मिळून काही अप्रतिम स्वररत्नांची लयलूट केलेली आहे .
किशोर कुमारला अवगत असलेल्या अनोख्या याॅडलिंग प्रकारचा सचिनदांनी आपल्या संगीतात खूप सुरेख वापर करून घेतला आहे ....
"चाहे कोई खुश हो चाहे" ( Taxi Driver – १९५४ )
"उंचे सूर में गाये जा" ( House No 44 – १९५५ )
"ऐ मेरी टोपी पलट के आ" ( फंटूश – १९५६ )
"हाय हाय हाय ये निगाहे" ( पेइंग गेस्ट – १९५७ )
फंटूश चित्रपटाच्या वेळी अनेकांचा विरोध सहन करून कुणालाही न जुमानता सचिनदांनी किशोरकडून
“ दुखी मन मेरे सून मेरा कहना"
हे अतिशय सुरेख गीत गाऊन घेतलं .....
किशोरने सचिनदांसाठी गायलेली
"मीत ना मिला रे मनका" ( अभिमान – १९७३ )
"बडी सूनी सूनी है जिंदगी ये जिंदगी" ( मिली १९७५ )
ही गाणी सुद्धा अप्रतिम आहेत .....
किशोर कुमारच्या खालोखाल देव आनंद साठी सचिनदांनी अनेक चित्रपटात हेमंत कुमारच्या आवाजाचा अप्रतिम वापर केलेला आहे ......
हेमंत कुमारच्या धीर गंभीर आवाजाला खुलवणारं
"तेरी दुनिया में जीने से" ( house no 44- १९५५ )
"चूप है धरती चूप है चांद सितारे" ( house no 44- १९५५ ) ,
"ये रात ये चांदनी फिर कहाँ" ( जाल १९५२ )
"है अपना दिल तो आवारा" ( सोलवा साल १९५८)
ह्या बरोबरच
“ दिल कि उमंगे है जवाँ"
हे अफाट विनोदी आणि
“ शिवजी बिहाने चले"
हे लोकसंगीतावर आधारित अशी दोन वेगळ्या जॉनरची गाणीही हेमंत कुमार कडून गाऊन घेतली आहेत .
तसंच प्यासा चित्रपटातील
" जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला "
हे अतिशय दर्दभर गीत हेमंत कुमारला दिलं .
गायिकांमध्ये लता त्यांची सर्वात आवडती .....
तिच्या आवाजात “मनाला शांत करून दु:ख हलकं करण्याचं सामर्थ्य आहे” असे ते म्हणत .....
खायचं पान हा सचिनदांचा विक पाॅईंट ...
पान म्हणजे त्यांचा जीव की प्राण .
स्वतःचं पान ते स्वत:च बनवत असत आणि इतर कुणालाही ते आपलं पान अजिबात देत नसत .
लताला मात्र गाण्याच्या प्रत्येक रेकोर्डिंग नंतर सचिनदांकडून ते खास पान मिळत असे .
लता मधल्या गायिकेला सचिनदां मधल्या संगीतकाराने दिलेला हा सर्वोच्च बहुमान होता .
लताने त्यांच्याकडे अनेक उत्कृष्ट गाणी गायली आहेत .....
"ठंडी हवाँये लेहेराके आये" ( नौजवान १९५१ ) एखाद्या आल्हाददायक वाऱ्याच्या झोक्याइतकच प्रसन्न सुरेल
"फैली हुई है सपनो की बांहे" ( house no 44 १९५५ ) स्वप्नांच्या दुनियेत अलवार घेऊन जाणारं
"चाँदनी राते प्यार की बाते" ( जाल १९५२ ) एका विरहिणीची केविलवाणी आर्त पुकार
"चाँद फिर निकला मगर तुम न आये" ( पेइंग गेस्ट १९५७ ) काळीज पिळवटून हृदयाला जाळणारा हा अंगार
"तुम ना जाने कीस जहाँ में खो गये" ( सजा १९५१ ) एकाकी विरहिणीचा हृदयाचं पाणी पाणी करणारा विलाप
"पिघला है सोना दूर गगन में" (जाल १९५२ ) गडद सायंकाळी त्या विश्वरचेत्याने निसर्गाशी केलेलं हितगुजच जणू...
खरंच यातलं एक एक गाणं म्हणजे अमुल्य ठेव आहे .......
आणि ह्याच सर्वात प्रिय असलेल्या लताचं आणि सचिनदांचं मिस इंडिया (१९५७) चित्रपटातील एका गाण्याच्या रेकोर्डिंगच्या वेळी एका लहानशा गैरसमजावरून बिनसलं .
त्यानंतर जवळ जवळ ६ वर्षे त्यांच्यात दुरावा होता .
सचिनदांनी मात्र ह्या काळातही आपल्या संगीताच्या दर्जावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही .
त्यांनी आशा भोसलेच्या आवाजात लाजवाब गाणी देऊन आपली खणखणीत बाजू सिद्ध केली .
पण सचिनदांच्या मनाचा मोठेपणा की त्यांचा मुलगा पंचम ( आर डी बर्मन ) याला त्याच्या छोटे नवाब ह्या पहिल्या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांनी लताशीच बोलणी करायचाच सल्ला दिला आणि संधी मिळताच लताशी परत दिलजमाई केली .
असं वाचलेलं की त्यानंतर सचिनदांनी लताला आपल्या घरी सामोसा खायला यायचं आमंत्रण दिलं .
लताने सुद्धा सचिनदांची योग्यता माहीत असल्याने कोणतेही आढेवेढे न घेता ते आमंत्रण खुल्या दिलाने स्वीकारलं ....
आणि रसिकांवर परत एकदा या सदाबहार जोडीने स्वररत्नांची लयलूट केली .....
"मोर गोरा अंग लै ले" ( बंदिनी १९६३ )
"रात का समा झुमे चंद्रमा" ( जिद्दी १९६४ )
"अबके सजन सावन में" ( चुपके चुपके १९७५ )
"चुपके चुपके चल री पुरवैय्या" ( चुपके चुपके १९७५ )
"नदिया किनारे हेराये आयी कंगना" ( अभिमान १९७३ )
"मैने कहा फुलो से हँसो तो" ( मिली १९७५ )
लता बरोबर बिनसलेल्या काळात सचिनदांनी आशा भोसलेला काही अवीट गोडीची गाणी दिली ज्यांची जादू आजही कायम आहे ....
"कोई आया धडकन कहती है" ( लाजवंती १९५८ )
"गा मेरे मन गा" ( लाजवंती १९५८ )
"देखने में भोला है दिल का सलोना" ( बंबई का बाबू १९६० )
"तुम जियो हजारों साल" ( सुजाता १९५९ )
"काली घटा छाये मोरा जिया तरसाये" ( सुजाता १९५९ )
"ओ पंछी प्यारे सांझ सकारे" ( बंदिनी १९६३ )
जरी किशोरकुमार , हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा आवाज सचिनदांनी सर्वात जास्त वापरला तरी इतर गायक गायिकांनाही त्यांनी काही अविस्मरणीय गाणी दिली आहेत .....
मोहम्मद रफी
"नाचे मन मोरा मगन दिकीदा धीकी धीकी" ( मेरी सुरत तेरी आंखे – १९६३ )
"खोया खोया चांद खुला आसमान" ( कालाबाजार १९६० )
"हम बेखुदी में तुमको पुकारे" ( काला पानी – १९५८ )
"ये महलो ये तख्तो ये ताजो की दुनिया" ( प्यासा – १९५७ )
"तू कहाँ ये बता इस नशीली रात में" ( तेरे घर के सामने १९६३ )
"दिन ढल जाये हाये रात न जाये" ( गाईड १९६५ )
शास्त्रीय गीतांसाठी बहुतेक करून निवडल्या जाणाऱ्या मन्ना डेना सचिनदांनी “ मेरी सुरत तेरी आंखे ” चित्रपटात
“ पुछो ना कैसे मैने रैन बिताई " आणि
“ तेरे नैना तलाश करे जिसे " ही गाणी दिलीच पण
"प्यार कि आग में तनबदन जल गया" ( जिद्दी १९६४ ) आणि
"किसने चिलमन से मारा नजारा मुझे" ( बात एक रात कि १९६२ )
ही दोन धम्माल विनोदी बाजाची गीते मन्ना डे कडून गाऊन घेतली .
तलतला त्यांच्या भावूक कंपित मखमली आवाजाला साजेशी
"जलते है जिसके लिये" ( सुजाता १९५९ )
"जाये तो जाये कहाँ" (taxi driver – १९५४) हि सोलो गीते आणि
"आजा आजा तेरा इंतेजार है" ( सजा १९५१ ) हे लता बरोबरचे सुरेल युगल गीत दिले .
मुकेशच्या अनुनासिक आवाजाला साजेशी
"चल री सजनी अब क्या सोचे" (बंबई का बाबू १९६० ) ,
"ओ जाने वाले हो सके तो लौट के आना" ( बंदिनी १९६३ ) आणि
"ये किसने गीत छेडा" ( मेरी सुरत तेरी आंँखे – १९६३ ) हे सुमन कल्याणपूर बरोबरच युगुल गीत दिलं ....
फक्त गायकच नाही तर गायिका सुद्धा त्यांनी चित्रपटातील नायिकेला आणि प्रसंगाला अनुरूप अशाच निवडल्या ...
गीता दत्तच्या मखमली आवाजाचा सचिनदांनी अतिशय सुरेख वापर करून घेतला ....
बाजी १९५१ चित्रपटात त्यांनी गीताला
“ तदबीर से बिगडी हुई तकदीर बनाले "
“ आज कि रात पिया दिल ना तोडो "
“ ये कौन आया "
“ लाख जमाने वाले डाले दिलो पे ताले "
ही लाजवाब गाणी तर दिलीच पण भावूक , करुण गाणी गाणारी म्हणून नाव झालेल्या गीता दत्तला त्यांनी
“ सुनो गजर क्या गाये " आणि
“ देखके अकेली मोहे बरखा सताये " ( ह्यात गीतादत्त चं “उई" अंगावर रोमांच उभ करत )
ही हलकी फुलकी भन्नाट गाणी दिली जी गीता अफाट गायली आहे .
गीता दत्तला सचिनदांनी
"वक्त ने किया क्या हसीं सितम" ( कागज के फूल १९५९ )
"जाने क्या तुने कही" ( प्यासा १९५७ ) ह्या लाडिक खोडकर गाण्याबरोबरच
“ आज साजन मोहे अंग लगालो" हे बंगाली लोकसंगीतावर आधारित असलेलं अप्रतिम भजन दिल .
खणखणीत आवाजाच्या शमशादला
"सैय्या दिल में आना रे" ( बहार १९५१ ) ह्यातलं “ छम छमा छम छम " गाण्याला एक वेगळ्याच पातळीवर नेतं
"दुनिया का मजा लेलो दुनिया तुम्हारी है" ( बहार १९५१ ) वातावरण जोशील करणारं हलकं फुलकं गाणं
"ये दुनिया रूप कि चोर" ( शबनम १९४९ ) हे बहुतेक हिंदी सिनेसृष्टीतल पहिलं बहुभाषिक गाणं असावं
"शरमाये काहे घबराये काहे" ( बाजी १९५१ ) हे बेफाम क्लब सोंग दिलं.
मखमली आवाजाच्या सुरैय्याला त्यांनी अफसर १९५० चित्रपटात
“ मनमोर हुआ मतवाला “
“ नैना दिवाने इक नाही माने ”
“ गुन गुन गुन गुन बोले रे भवर " ही सुरेल तरल गाणी दिली .
गाईड (१९६५) चित्रपटाच्या वेळी मात्र एकाच गाण्याचं संगीत देऊन सचिनदा आजारी पडले .
त्यांनी देव आनंदला दुसऱ्या संगीतकाराला घ्यायची विनंती केली .
देवने सचिनदा पूर्ण बरे होईपर्यंत थांबायची तयारी ठेवली .
सचिनदांनी त्याला विचारलं, “ मी बरा झालो नाहीच तर ?” .
पण देवचीही सचिनदांवर इतकी भक्ती की त्याने म्हटलं “तसं होणार नाही आणि झालंच तर मी एकच गाणं घेऊन चित्रपट काढीन".
पण आपल्या भाग्यात सचिनदांनीच संगीत दिलेला संपूर्ण गाईड होता आणि गाईड ने इतिहास रचला .....
गाईड चित्रपटात सचिनदांच्या प्रतिभेने चरमसीमा गाठली आहे .....
यातलं प्रत्येक गीत म्हणजे एक अनोखा यशस्वी प्रयोगच जणू .
" आज फिर जीने की तमन्ना है "
हे सर्वसाधारण गीताचे नियम झुगारून मुखड्या ऐवजी अंतर्याने सुरु होणारं गाणं .
आपल्या आयुष्यातील सगळी बंधनं झुगारून आजवर बंदिस्त असलेली नायिका मुक्त झाली आहे . तिच्या आजवरच्या काळोख्या आयुष्यात सोनेरी पहाट उगवली आहे .... सचिनदांच्या लाजवाब संगीताने , लताच्या चिरतरुण खळाळत्या आवाजाने आणि वाहिदाच्या जिवंत अभिनयाने अजरामर झालेलं हे गीत ....
“ मोसे छल किये जाये.. सैय्या बेईमान" आणि
“ क्या से क्या हो गया तेरे प्यार में "
केवळ लय कमी जास्त करून एकाच मुशीतून साकार केलेली ही दोन गीतरत्ने म्हणजे त्यांच्या असामान्य प्रतिभेचा ढळढळीत पुरावा .
“ पिया तोसे नैना लागे रे" कल्पक चित्रीकरण , होळी आणि दिवाळीच्या सणांचे वर्णन त्यांना साजेशी वाद्ये तसेच दिवस रात्रीच्या काळातला बदल दाखवणारे संगीत .
ह्या गीतातील असंख्य पैलू दिग्मूढ करतात .
गाईड हा सिनेसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा अशा सर्वांगसुंदर गाईड चित्रपटाच्या यशात सचिनदांचे योगदान नक्कीच लक्षणीय आहे .
निसर्गसौंदर्याने नटलेल्या बंगालच्या बाऊल लोकसंगीताचा जबरदस्त प्रभाव सचिनदांच्या संगीतात जाणवतो .
गाण्यांच्या चाली आधी रचून मग त्या संगीताला साजेशी शब्दरचना करण्यावर त्यांचा भर होता .
त्यांच्या गीतांमध्ये सितार , संतूर , गिटार , बासरी , तबला , ढोल यांचा अतिशय माफक पण सुरेख वापर आढळतो .....
संगीत हा त्यांचा प्राण होता . त्यांच्या आवाजातही एक वेगळीच मोहिनी
" सफल होगी तेरी आराधना "
" सुन मेरे बंधू रे "
" वहाँ कौन है तेरा " ही गाणी ऐकली की त्याचा प्रत्यय येतो .
१९४५ ते १९७५ जवळ जवळ तीन दशक त्यांनी उत्तमोत्तम संगीत असलेली गाणी दिली आहेत .
संगीताची उत्तम जाण असूनही त्यांच्या चाली साध्या सोप्या , आकर्षक , ऐकताच गुणगुणाव्याशा , ओठांवर रेंगाळणाऱ्या असायच्या .
ह्याला कारण त्यांच्या कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीला झालेला एका गमतीशीर प्रसंग होता म्हणायला हरकत नाही .
सचिनदांनी तेव्हा हिंदी सिनेसृष्टीत अगदी ४/५ सिनेमेच जुने होते .
एकदा सचिनदांनी त्यांच्या नोकराला संगीतकार नौशादच्या ( रतन १९४४ ) चित्रपटातल “ अँखिया मिलके जिया भरमाके “ हे गाणं दिवसभर गुणगुणताना ऐकलं .
आपण संगीतकार असूनही आपला नोकर आपलं गाणं न म्हणता नौशादचं गाणं म्हणतो हे पाहून त्यांनी त्याच क्षणी ठरवलं की यापुढे सर्व सामन्यांच्या तोंडी अगदी सहज रुळेल असंच संगीत द्यायचं आणि त्यांनी हाच नियम शेवटपर्यत पाळला .
सचिनदा प्रणयी युगल गीतांचे सम्राट होते ......
“ आ गुपचूप गुपचूप प्यार करे " ( सजा १९५१ ) हेमंत कुमार आणि संध्या मुखर्जी यांच्या आवाजातील ह्या गाण्याचे सुरुवातीचे “ टंबले दो कंबले , नाकेमुके चुनकले नाकेमुके चुनकले “ हे कानाला अतिशय गोड वाटणारे अजब शब्द ऐकून श्रोता आपल्याही नकळत डोलायला लागतो .....
"रिमझिम के तराने लेके आई बरसात" ( काला १९६० )
"इक घर बनाऊंगा तेरे घर के सामने" ( तेरे घर के सामने १९६३ )
"कोरा कागज था" (आराधना १९६९ )
"गुनगुना रहे है भँवरे" ( आराधना १९६९ )
"जीवन की बगिया मेहेकेगी" ( तेरे मेरे सपने १९७१ )
"लिखा है तेरी आँखो में" ( तीन देवीया १९६५ )
"ये दिल दिवाना है दिल तो दिवाना है" ( इश्क़ पर जोर नाही – १९७० ) यात प्रत्येक वेळी शब्दांचा क्रम बदलून एकच वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने गायलेलं ऐकायला कसलं गोड वाटतं.
वर सांगितलेली युगलगीते तर सुरेल आहेतच पण त्यांची खट्याळ , खोडकर युगल गीते तर अक्षरशः कहर आहेत
"दे भी चुके हम दिल नजराना दिल का" ( जाल १९५२ )
ह्यात गीता दत्त कसली तोऱ्यात ( राग पुर्राना दिलका ) म्हणते .
"हम आप की आँखोमे" ( प्यासा १९५७ )
यातले स्वप्नाळू प्रेमिकाचे लाडिक सवाल आणि त्याला प्रेयसीने दिलेले जमिनीवर आणणारे जवाब ... यातलं व्हायोलिन लाजवाब
"ओ निगाहे मस्ताना" ( पेइंग गेस्ट १९५७ )
यातलं आशाच्या लाडिक आवाजातलं ( हम्म हम्म ) कानांना किती गोड वाटतं
"छोड दो आँचल" ( पेइंग गेस्ट १९५७ )
यातंही आशा ने म्हटलेला तो " आह " ऐकून कलिजा खल्लास झाल्याशिवाय राहात नाही .
"आँखो में क्या जी" ( नौ दो ग्यारह १९५७ ) मध्येही आशा आणि किशोरचे खट्याळ सवाल जवाब मनाला गुदगुल्या करणारे , हवेहवेसे .... आणि “ बादल " म्हणतानाचा तो अल्लड आलाप तर केवळ लाजवाब...
"अच्छाजी मैं हारी" ( काला पानी १९५८ )
खोडकर मधुबाला आणि चिडखोर देव आनंद कसले दिसतात ...
"मैं सितारोंका का तराना" ( चलती का नाम गाडी १९५९ )
मधला फक्त “ पाँच रुपैय्या बारा आना " किशोर कुमार ने घातलेला गोंधळ तर क्या कहने .
दिवाना मस्ताना हुवा दिल ( बंबई का बाबू १९६० )
ह्यातले विलक्षण आलाप आणि गाण्याला दिलेला वेगळा इको इफेक्ट...
ह्या आणि अशा असंख्य गीतांमुळे ते आजही रसिकांच्या हृदयावर राज्य करत आहेत आणि करतच राहणार ....
त्यांचं प्रत्येक गाणं आजही तितकंच लोकप्रिय , अजरामर आहे .
म्हणूनच आजही त्यांच्या गाण्यासोबत एकट्यानेच लांब लांब रम्य स्वप्नांच्या दुनियेत जावंसं वाटतं .....
त्यांच्या गीतांमध्ये हरवून आपली मंझील गाठावीशी वाटते ....
“ फैली हुई है सपनों की बाहें
आजा चल दे कहीं दूर
वही मेरी मंझील वही तेरी राहें
आजा चल दे कहीं दूर ".....
© नयना पिकळे