के. एल. सैगल म्हणजेच कुंदनलाल सैगल म्हटलं की हल्लीच्या काळात नेहमीच 2 टोकाची मतं ऐकायला मिळतात. त्यांच्या आवाजावर जीव ओवाळून टाकणाऱ्या रसिकांची आणि त्याच्या आवाजाला नावं ठेवणाऱ्यांची.
पण अहो जिथे लताच्या आवाजावर सुद्धा टीका करणारे मतिमंद महाभाग आहेत तिथे आज सैगलचं महत्त्व जाणणारे विरळाच.
म्हणूनच हा लेख केवळ त्यांच्यासाठी ज्यांनी सैगलच्या जादुई स्वरांची नशा चाखली आहे, अनुभवली आहे.
के एल सैगल ह्यांनी खरंतर संगीताचं कोणतंही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नव्हतं. आणि म्हणूनच असेल कदाचित की त्यांचे स्वर कंठातून नाही तर हृदयातून उमटत असत. त्यांच्या आवाजात एक आगळी नैसर्गिकता, एक प्रामाणिकता जाणवते. त्यांच्या आवाजात निर्मळ निर्झराची उत्कटता आहे, आत्मानंदाची अनुभूती आहे जी शब्दबद्ध करणं अतिशय कठीण. गाणं हेच त्यांचं जीवन होतं, त्यांचा आत्माच होता म्हणा ना.
गाण्यातील काही खास शब्दांवर विशिष्ट प्रकारे जोर देत तो शब्द अनेक प्रकारे आंजारत, गोंजारत त्याला जणू कुरवाळत गाणं ही सैगलची खासियत.
"मैं क्या जानू क्या जादू है" (जिंदगी 1940) ह्या गीतात "क्या जादू है" ह्या शब्दावर प्रत्येकवेळी सैगलनी सुरेल मनमोहक गिरक्या घेऊन ह्या गाण्याची जादू द्विगुणित केली आहे .
"बालम् आये बसो मोरे मन में" (देवदास 1935 )
"दों नैना मतवारे तिहारे" (मेरी बहन 1944)
"मुस्कुराते हुए यु आँख चुराया न करो" (भंवरा 1944)
"कहीं उलझ न जाना" (परवाना 1947)
“मूहब्बत में कभी ऐसी भी हालत” (परवाना 1947)
ह्या सर्व गाण्यांमधला सैगल केवळ डोळे बंद करून अनुभवावा. गाण्याच्या प्रत्येक ओळी सरशी हृदयात कुणीतरी अलगदपणे असंख्य रेशीम लडी उलगडल्याचा भास होतो ..
त्यांची प्रणयगीते जितकी लोकप्रिय झाली त्याहून कितीतरी अधिक त्यांची विरहगीते गाजली.
"ए कातीब - ए - तकदीर" (मेरी बहन 1944)
"गम दिये मुस्तकिल" (शाहजहान 1946 )
"चाह बरबाद करेगी हमें मालूम न था" (शाहजहान 1946 )
"बाबूल मोरा नैहर छुटो" (स्ट्रीट सिंगर 1938)
ह्या सर्व गाण्यांमधून जाणवणारा दर्द काळीज जाळतो.
"दुख के अब दिन बितत नाही" (देवदास 1935 ) हे तर सर्वात कहर गीत.
चित्रपटातील नायक देवदासची अगतिकता, त्याचं वैफल्य, त्याची हतबलता सारं काही श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर केवळ आपल्या आवाजातून सैगलनी किती विलक्षण ताकदीने साकारलं आहे .
"जब दिल ही टूट गया" (शाहजहान 1946 ) संपल्यावर सुद्धा कितीतरी वेळ तिथेच घुटमळायला लावणारं असं हे गाणं.
ह्यातली वेदना खूपच जीवघेणी, अंतर्मुख करणारी..
पण तरी तिला दूर सारण्याऐवजी उराशी कवटाळल्यावर एक प्रचंड दिलासा देणारी.
“हम अपना उन्हें बना न सके” (भंवरा 1944)
ह्या गाण्यात "वो बोले" ह्या दोन शब्दांवर सैगलनी प्रत्येक वेळी वेगळ्या ठिकाणी असे काही pauses घेतले आहेत की त्यातून आपल्या प्रेमाला नायिकेचा योग्य प्रतिसाद न मिळाल्याने वाटणारं आश्चर्य, खेद, नैराश्य सर्वच अगदी अचूक व्यक्त झालं आहे.
सैगलच्या आवाजातील भक्तिगीतं सुद्धा आवर्जून ऐकावी अशीच आहेत.
"मधुकर शाम हमारे चोर" (भक्त सूरदास 1942)
ह्यात आपल्या लाडक्या दैवताला हक्काने, प्रेमाने चोर म्हणायचा भक्ताचा अधिकार किती सहज व्यक्त झाला आहे .
तानसेन (1943) हा सुद्धा सैगल ह्यांचा अतिशय गाजलेला चित्रपट. ह्यातली तर सगळीच गाणी एक से एक लाजवाब.
“सप्त सुरन तीन ग्राम”,
“बाग लगादू सजनी”,
‘झगमग झगमग दिया जलाओ”,
“रुमझुम रुमझुम चाल तिहारी”,
ह्या सर्व गीतांमध्ये एक वेगळाच आवेग किंवा उर्जा जाणवते. खऱ्या तानसेनाला तर आपण कोणीही पाहिलेलं नाही. पण सैगलना ऐकल्यावर मात्र खात्रीच पटते की त्यांनी मनात आणलं असतं तर बाग लगानेकी आणि दिये जलाने की क्षमता त्यांच्या आवाजात नक्कीच होती.
“एक बंगला बने न्यारा” (प्रेसिडेंट 1937)
“एक राजे का बेटा लेकर उडने वाला घोडा” (प्रेसिडेंट 1937)
“दुनिया रंगरंगिली बाबा” (धरती माता 1938)
ही सुद्धा सैगलची काही गाजलेली हलकी फुलकी गाणी ऐकताना मनाला एक वेगळाच आनंद मिळतो.
“सोजा राजकुमारी सोजा”(जिंदगी 1940 ) हे तर बहुतेक हिंदी सिनेसंगीतातलं पाहिलंच अंगाई गीत असावं आणि तेही पुरुषाच्या अवजातलं.
प्रत्येक वेळी “सो जा” हे शब्द इतक्या वेगवेगळ्या प्रकारे लडिवाळपणे आळवलेले आहेत की त्यांच्या आवाजातील स्त्रीला लाजवणारं मार्दव ऐकून थक्क व्हायला होतं.
तसंच "ए दिल - ए - बेकरार झुम" (शाहजहान 1946 ),
"मेरे सपनो की रानी रूही रूही रूही" (शाहजहान 1946 ),
"उस मस्त नजर पे पडी जो नजर" (परवाना 1947)
ही सुद्धा सैगलच्या आवाजातील काही अवीट गोडीची अजरामर गाणी.
असं म्हणतात की काही गोष्टींची आवड develop करावी लागते. पण एकदा का ती आवड निर्माण झाली की मग त्याची सर इतर कशालाच येत नाही.
सैगल ह्यांचा आवाज देखील अशाच पठडीत मोडणारा. कदाचित मोहम्मद रफी, किशोर वगैरैंसमोर सैगलचा आवाज आज अनेकांना खूपच जुनापुराणा वाटेल. पण ज्यांना ह्या आवाजातली जादू कळली तेच खरे भाग्यवंत.
कविवर्य बा.भ.बोरकर ह्यांच्या "जीवन त्यांना कळले हो" च्या धर्तीवर "संगीत त्यांना कळले हो" असं आपण सैगलच्या चाहत्यांबद्दल छातीठोक पणे म्हणू शकतो.
काही गोष्टी केवळ स्वानुभवानेच कळतात. आणि त्यातलीच एक म्हणजे सैगल ह्यांचा आवाज. म्हणून ह्या संगीताच्या महामेरू समोर कृतकृत्य होऊन, दंडवत घालून, त्यांच्याच शब्दात त्यांना सांगावंसं वाटतं की ..
“मैं क्या जानू क्या जादू है"
©नयना पिकळे