शुक्रवार, ८ मार्च, २०२४

गीतकार - साहिर लुधियानवी (संसार से भागे फिरते हो)

 आज साहिरचा जन्मदिवस . त्याचं सिनेसृष्टीतलं योगदान इतकं अफाट आहे कि कितीही लिहीलं तरी ते कमीच ठरेल. शिवाय आजवर त्याच्यावर अनेकांनी भरभरून लिहीलेलंही आहेच. म्हणून त्याच्या सर्वंच उत्कृष्ट गीतांपैकी एक जे मला अतिशय आवडतं त्यावर लिहायचं ठरवलं ....

सन्सार से भागे फिरते हो
भगवान को तुम क्या पाओगे
इस लोग को भी अपना ना सके
उस लोक में भी पछताओगे ” .....
पृथ्वीलोक, इथला आपला जन्म, इथलं प्रयोजन ह्यावर आजवर अनेकांनी काथ्याकुट केला आणि यापुढेही तो होतंच राहील ....
पण खरंच आपल्याला मिळालेला सीमित वेळ या चर्चेत घालवणं इतकं महत्त्वाचं आहे का ? ......
जगाचा रसिकतेने आस्वाद घ्यायचं सोडून त्या कधीच कोणीही न पाहिलेल्या, कोणालाही आकलन न झालेल्या अज्ञाताकडे आकर्षित व्हायची इतकी ओढ का ? कशासाठी ?
जर ते अज्ञात विश्व असेलच तर जाऊच कि आपणही तिथे… आपली योग्य वेळ आल्यावर ....
पण त्या आधी इथलं वास्तव्य, इथला वावर त्या ईश्वराच्या पसंतीला उतरेल असा नको का ?
इश्वराने निर्माण केलेल्या ह्या जगाबद्दल, त्याने दिलेल्या ह्या जन्माबद्दलच जर एवढी अनासक्ती दाखवली तर तो त्या दुनियेत प्रवेश देईल असं खरंच वाटतं का ? .....
“ ये पाप है क्या ये पुण्य है क्या
रीतों पर धर्म की मोहरें हैं
हर युग में बदलते धर्मों को
कैसे आदर्श बनाओगे
सन्सार से भागे फिरते हो ” ....
समाजात वेळोवेळी होणारे बदल समाजमान्य ठरावेत म्हणून अनेकदा त्यावर धर्माची मोहोर लावून त्यांना पुण्यकर्म ठरवण्यात येतं.
पापपुण्याची व्याख्या कोण ठरवतं ?
प्रत्येक युगात बदलणाऱ्या पापपुण्याच्या कल्पनांना कोणत्या निकषा वर तपासून पाहिलं जातं ??
जर ही व्याख्या प्रत्येक युगात बदलत राहिली तर मग कशाला आदर्श म्हणायचे ?
सती जाणं, मुलगी ॠतुमति होताच तिचा विवाह करणं अशा गोष्टी पुर्वी पुण्यदायक मानल्या जायच्या …
पण आज मात्र त्यावर कायद्याने बंदी आहे ....
पुण्य मानलेली कर्मच जेव्हा जाचक ठरू लागतात तेव्हा त्यात बदल करावाच लागतो.
तर मग पाप कोणतं आणि पुण्य कोणतं ??
कशासाठी ह्या चुकीच्या संकल्पनांना उराशी कवटाळून बसायचं ?? बदलत्या काळानुसार बदलणं योग्य नाही का ?? कारण बदल हाच कायमस्वरूपी असतो …..
“ ये भोग भी एक तपस्या है
तुम त्याग के मारे क्या जानो
अपमान रचेता का होगा
रचना को अगर ठुकराओगे
सन्सार से भागे फिरते हो ” .....
इश्वराच्या रचने कडे एवढ्या विरक्तीने पहाणं म्हणजे समोरचं भरलं पंचपक्वान्नांचं ताट लाथाडून नंतर त्याच्याच कडून परत आदरातिथ्याची अपेक्षा बाळगणं ....
त्या जगत निर्मात्याचा काय मान राहिला यात ??
त्याला अपमानित करूनही त्याने आपल्याला स्वीकारावं हि अपेक्षा कशी ठेवायची ?
वर गेल्यावर येईल तरी का तो आपल्या स्वागताला ??







“ हम कहते हैं ये जग अपना है
तुम कहते हो झूठा सपना है
हम जनम बिता कर जायेंगे
तुम जनम गँवा कर जाओगे
सन्सार से भागे फिरते हो ” ...
पाप पुण्याच्या , त्यागाच्या भ्रामक कल्पनांना भुलून आपण हे सत्य, सुंदर, समोर प्रत्यक्ष दिसणारं जग लाथाडतो आणि त्या आभासी आजवर कधीही न पाहिलेल्या जगात जाण्यासाठी मात्र आयुष्यभर झटत रहातो .....
ती दुनिया मिळायची तरी कोणी खात्री दिली आहे का ?
ईशावास्य उपनिषदात अगदी पहिल्याच श्लोकात ऋषी याज्ञवल्क्य यांनी व्यवहार आणि तत्त्वद्यानाचा अतिशय सुरेख मेळ घातला आहे . ते म्हणतात .....
ईशावास्यम् इदं सर्वं
यत्किंच जगत्या जगत्
तेन त्यक्तेन भून्जीथा
मा गृध: कस्यस्विद् धनम् ||
म्हणजेच या जगाचा उपभोग घेणं यात चुकीचं काहीच नाही ... तो घ्यायलाच हवा . पण त्याविषयी आसक्ती ठेवू नका .
इतरांच्या धनाचा चुकूनही गैरफायदा करून घेऊ नका .
असं कर्म करत जो जगतो तोच खऱ्या अर्थाने ईश्वराची साधना करतो .
तोच खरा साधक .
त्या जगदीश्वराच्या निर्मिताचा मान ठेवून ह्या दुनियेचा रसिकतेनं उपभोग घेणं हीच त्याची खरी भक्ती, खरी पुजा .
याज्ञवल्क्य ऋषींनी उपनिषदात जे गहन तत्त्व सांगितलं तीच आयुष्याची व्याख्या , सर्व सामान्यांना कळेल अशा सहज सुंदर शब्दात एवढ्या अचुकपणे लिहिणारा गीतकार साहीर लुधियानवी शिवाय दुसरा कोण असु शकतो ??
कोण जास्त खरा ??
भोगी की योगी ?
कोणाला आयुष्याचा खरा अर्थ कळला ??
वाट्याला आलेलं आयुष्य, आहे तसं विनातक्रार स्वीकारुन ते भरभरून जगणार्या चित्रलेखेला (मीना कुमारीला) ??
की भगवी वस्त्र घालून , सर्वसंगपरित्याग करूनही मनाला ताब्यात न ठेवु शकणार्या कुमारगिरीला ( अशोक कुमारला ) ?? ......
आजीवन ब्रह्मचारी योगी असलेला कुमारगिरी ह्या चित्रपटात नर्तकी चित्रलेखाला वासना आणि भोगां पासून प्रवृत्त करण्याचा उपदेश देतो.
पण त्याला हे कळत नाही कि वासना ही कृतीत नसते तर मनात असते.
जर मन स्थिर असेल तर भोग सुद्धा एक तपस्याच असते पण मन थार्यावर नसेल तर मात्र आयुष्यभराची तपस्या वाया जाते.
समस्त आयुष्याचं सार सांगणारं , 'चित्रलेखा' चित्रपटातलं मीना कुमारी वर चित्रित असलेलं लताने गायलेलं आणि संगीतकार रोशन ह्यांनी तितकंच आकर्षक संगीत दिलेलं हे गाणं म्हणजे साहिरच्या सर्वोत्कृष्ट रचनांपैकी एक .....

© नयना पिकळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

🌸🌺🌹 बसंत है आया रंगीला 🌷🌻🥀

  कडाक्याच्या थंडीत डोक्यापर्यंत पांघरूण घेऊन झोपलं असताना अचानक एके दिवशी पाहटे कोकिळेची कुहूकुहू ऐकून जाग येते आणि एका क्षणात मनावरची मरगळ...