४० /५० च्या दशकतल्या जुन्या हिंदी सिनेगीतांशी अगदी अजाणत्या वयापासून मैत्री झालेली असली तरी गझल ह्या प्रकाराची मात्र जरा उशीराच ओळख झाली . म्हणजे चित्रपटातल्या अनेक गझला ऐकल्या होत्या , आवडल्याही होत्या पण त्या वयात ह्या प्रकाराला गझल म्हणतात हेच मुळी माहीत नव्हतं .
पहिली गझल ज्यामुळे गझलशी खऱ्या अर्थाने प्रेमाचं नातं जुळलं ती होती "अर्थ" चित्रपटातली “तुम इतना जो मुस्करा रहे हो” .
मग हळुहळु लक्षात यायला लागलं की
“नुक्ताचीं है गम-ए-दिल” ( मिर्झा गालिब – 1954 )
“हमसे आया न गया” ( देख कबीरा रोया – 1957)
“रंग और नूर की सौगात किसे पेश करू” ( गझल – 1964)
ही आधीपासून आवडणारी जुनी गाणी सुद्धा गझल प्रकारातच मोडतात .
पण तरीही
“तुम इतना जो मुस्कुरा रहे हो”
“होठोंसे छुलो तुम”
“झुकी झुकी सी नजर”
“तेरे खुशबू में बसे खत”
ह्या गझलांचं वेगळेपण जाणवत राहिलं .
ह्या गझल गायकाच्या मुलायम मखमली स्वरातील आर्तता काही म्हटल्या विसरता येईना .
आवाजात तर इतका हळवेपणा की त्यातल्या दुखाच्याही प्रेमात पडावसं वाटलं . हा मनात घर करणारा गझल गायक होता अर्थातच जगजीत सिंग .
माझ्या पुरतं विचाराल तर गझल म्हणजे जगजीत सिंग हे समीकरण तेव्हापासूनच मनात पक्कं झालंय .
नंतर बेगम अख्तर , फरीदा खानुम , गुलाम अली , मेहदी हसन , पंकज उदास , भूपिंदर सिंग , तलत अजीज ह्यांच्या आणि इतर अनेकांच्या गझला ऐकल्या , आवडल्या , भावल्या , हसवून , रडवून गेल्या .
पण First love is first love .
जगजीत सिंगने हृदयात जी जागा पटकावली आहे ती आजतागायत कोणीच घेऊ नाही शकलं .
गझल सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगजीत सिंगचं खरं नाव होतं जगमोहन सिंग धीमान .
राजस्थान मधल्या गंगानगर नावाच्या गावी एका पंजाबी सिख कुटुंबात ८ फेब्रुवारी १९४१ रोजी जगजीत सिंग चा जन्म झाला .
लहानपणापासून संगीताची आवड असल्याने १९६१ मध्ये वयाच्या विसाव्या वर्षापासूनच त्याने जालंधर येथील ऑल इंडिया रेडियो स्टेशन वर गायला सुरवात केली .
त्याच दरम्यान यश आजमावण्यासाठी तो मुंबईला आला आणि १९६७ साली त्याची ओळख चित्रा दत्त ह्या बंगाली गझल गायिके बरोबर झाली .
दोघांच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं . चित्रा ने आपल्या पहिल्या पती पासून घटस्फोट घेतला आणि आपल्या 9 वर्षांच्या मुलीला घेऊन ती वेगळी झाली .
जगजीत चित्रा दोघांनी 1969 मध्ये विवाह केला . दोघेही आता एकत्रितपणे गाऊ लागले
“मिलकर जो जुदा हुए तो ना सोया करेंगे हम”
“पहले तो अपनी दिल की रजा मान जाइये”
दोघांना चांगला प्रतिसाद मिळू लागला .
त्यातच १९७७ साली रिलीज झालेल्या “The Unforgettable” ह्या गझल आल्बम ने त्यांना अभूतपूर्व अशी प्रसिद्धी मिळवून दिली . ह्या अल्बम मधली सगळीच गाणी एक से एक होती . पण
“बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी”
“दोस्त बन बन के मिले मुझको”
“किसी रंजिश को हवा दो”
“सरकती जाये है रुख से नकाब”
ह्या गझलांनी कहर केला आणि रातोरात जगजीत चित्रा दोघेही असंख्य रसिकांच्या दिल की धडकन बनले .
तेव्हापासून जगजीत सिंगच्या गझलांची जी नशा चढलेली आहे ती तसू भरही कमी झालेली नाही .
“तेरे आने की जब खबर महके”
“इन्तेहा आज ईश्क की कर दी”
“धडक आहिस्ता से ऐ दिल”
"जब सामने तुम आ जाते हो"
“झूकी झूकी सी नजर बेकरार है के नहीं”
ह्या गझलामधून प्रेमाची लज्जत हळुवार पणे खुलवणारा तारुण्याचा बहर , जाणवत राहणारा उन्मुक्त गंध आपल्या भोवती रुंजी घालत राहतो ..
"होशवालोंको खबर क्या"
"किसका चेहरा अब मैं देखु"
“ये तेरा घर ये मेरा घर”
“बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी”
“वो कागज की कश्ती”
“प्यार मुझसे जो किया तुमने”
“काटों से दामन उलझाना मेरी आदत है”
“बेसबब बात बढ़ाने की जरूरत क्या है”
“कल चौदहँवी की रात थी”
“तुम हमारे नही तो क्या गम है”
"चिट्ठी ना कोई संदेस"
"ये दौलत भी ले लो"
"दुनिया जिसे कहते है जादुका खिलोना है"
आणि मग असा एका पेक्षा एक लाजवाब गझलांचा सिलसिलाच सुरू झाला .
ह्या आणि इतर अनेक गझलां मधून जगजीत सिंगने लाखों करोडो रसिकांना आपल्या स्वरांच्या वर्षावात चिंब भिजवले . कधी रसिकांच्या आयुष्यात बहार फुलवली तर कधी विराण क्षणात त्यांच्या दुःखावर हळुवार फुंकर मारली , त्यांची सोबत केली .
ह्याच दरम्यान 1990 साली एक अशी घटना घडली ज्यामुळे जगजीत आणि चित्राच्या आयुष्यावर दुखाची जणू कुऱ्हाडच कोसळली .
त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे विवेकचे एका अपघातात अत्यंत दुर्दैवी निधन झाले . हा धक्का दोघांसाठी जबरदस्त होता . ह्या प्रसंगानंतर चित्राने आपलं गाणंच कायमच थांबवलं .
1985 साली जगजीत सिंग ने संगीत दिलेली
“कभी तो खुल के बरस अब्र-ए-मेहरबान की तरह
मेरा वजूद है जलते हुए मकान की तरह”
ही गझल चित्रा गायली होती खरी पण मुलाच्या निधनामुळे तिच्या मनावर झालेला आघात , साठलेलं दुख ह्यांना ती नाही वाट करून देऊ शकली .
नियती तिच्यावर मेहेरबान नाहीच झाली . तिला माघार घ्यायला लावली नियतीने .
चित्रा कायमची कोशात गेली आणि आतल्या आत स्वतःच्या दुखात होरपळत राहिली .
जगजीत सिंगलाही काही काळ नैराश्याने गाठलं .
पण तरीही नाउमेद न होता फिनिक्स पक्ष्या सारखं परत एकदा त्याने स्वतःला सावरलं .
आपलं विश्व परत एकदा उभारलं , साकारलं .
लता मंगेशकर बरोबर ह्याच काळात रिलीज झालेला जगजीत सिंगचा “सजदा” हा आल्बम गाजला .
“किसको कातील मै कहूँ”
“कभी युँ भी आ मेरी आँख में”
“हर तरफ हर जगह”
“मिली हवाओं मे उडने की ये सजा”
परत एकदा जगजीत गाऊ लागला .
त्याच्या गझलांमधला दर्द आता आणखीनच उठून दिसत होता .
एक अधुरेपण , एक खंत कायम डोकावत असल्याचा भास व्हायचा त्याच्या आवाजातून .
“मेरे दुख की कोई दवा न करो
मुझको मुझसे अभी जुदा न करो”
“वो रुलाकर हँस न पाया देर तक
जब मै रोकर मुस्कुराया देर तक”
“चाख जिगर के सी लेते है
जैसे भी हो जी लेते है”
“कभी कभी युँही हमने अपने दिल को बहलाया है
जीन बातों को खुद नहीं समझे औरों को समझाया है”
“तन्हा-तन्हा हम रो लेंगे महफिल-महफिल गायेंगे
जब तक आंसू साथ रहेंगे तब तक गीत सुनायेंगे”
“बेनाम सा ये दर्द ठहर क्यूँ नहीं जाता
जो बीत गया हैं वो गुजर क्यूँ नहीं जाता”
काळजावर ओरखडा उमटतो अशा गझला ऐकल्या की ..
ह्या गझला इतक्या व्याकूळ करतात की रात्रीचा अंधारही ह्या काळोखात गुडूप होतो ..
निस्तब्ध निरव शांततेत जणू आपलं अस्तित्वच विरून जातं ..
“तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
क्या गम है जिसको छुपा रहे हो”
ही गझल तर तो स्वतः अक्षरश: जगला आहे .
2003 मध्ये ह्या गझल सम्राटाचा भारत सरकारने पद्म भूषण पुरस्कार देऊन सत्कार केला तर 2014 मध्ये त्याच्या नावाचे 2 पोस्टल स्टॅम्प सरकारने जारी केले .
तसंच राजस्थान , दिल्ली , हरयाणा आणि मध्यप्रदेश सरकार कडूनही त्याला विविध पुरस्कार मिळाले .
आज जगजीत सिंगला जाऊन खरंतर दहाच्या वर वर्ष उलटून गेली आहेत .
पण हे खरंच नाही वाटत कारण आजही त्याचा आवाज आपल्या भोवती कायम वावरतो आहेच .
शेवट पर्यंत जगजीत सिंग आपल्या गझलांमधून आपलं दुख व्यक्त करत राहिला . त्याच्या दर्दभऱ्या गझलांमध्ये अनेकांना सुकून मिळाला .
जणू आपल्या आयुष्याच्या रखरखीत वाळवंटात तो मृगजळ शोधत राहिला .
त्याला मृगजळ मिळालं का हे आपल्याला नाहीच समजू शकणार .
पण ह्या मृगजळानेनी असंख्य रसिकांना मात्र थंडावा दिला , रिझवलं . उन्हं भर माथ्यावर आलं असताना एक हक्काचं विसाव्याचं स्थान बनल्या त्याच्या गझला .
आणि म्हणूनच आज ह्या गझल सम्राटाच्या जन्मदिवशी त्याला त्याच्याच शब्दात सांगावंसं वाटतं की
“तुमको देखा तो ये खयाल आया
जिंदगी धूप तुम घना साया”
© नयना पिकळे