मंगळवार, १६ जानेवारी, २०२४

संगीतकार - ओ. पी . नय्यर

 संगीतकार ओ पी नय्यर ह्यांचा आज स्मृतिदिन . त्यांची मदमस्त संगीताने नटलेली जवळ जवळ सर्वच गाणी इतकी लोकप्रिय आहेत की त्यांची परत ओळख करून देण्यासारखं खरंतर काहीच नाही .

पण तरीही आज आपण ह्याच लोकप्रिय गाण्यांमधील काही गाण्यांची परत एकदा नव्याने ओळख करून घेणार आहोत .
बहुतेक सर्वच सिने रसिकांना माहीत असेल की कोणत्याही चित्रपटासाठी त्यातील प्रसंगानुसार अनेक गाणी रचली जातात, बसवली जातात, गायकांकडून गाऊनही घेतली जातात आणि काहींचं तर चित्रीकरण सुद्धा होतं .
पण तरीही कधी कधी कोणत्या तरी कारणामुळे त्या गाण्यांचा चित्रपटात समावेश होत नाही .
अशी असंख्य गाणी आहेत .
संगीतकार ओ पी नय्यर यांची सुद्धा अशी काही गाणी आहेत . आणि मुख्य म्हणजे ती इतकी लोकप्रिय आहेत की आपला विश्वासच नाही बसत की ती मूळ चित्रपटात नाहीत .
ह्यातलं सर्वात पहिलं गाणं आहे C. I. D (१९५६) चित्रपटातलं
“जाता कहाँ हैं दिवाने
सब कुछ यहाँ हैं सनम
बाकी के सारे फसाने
झुठे हैं तेरी कसम ..
ऐकून आश्चर्य वाटलं ना ? ह्या गाण्याचं खरंतर चित्रीकरण सुद्धा झालेलं . आणि हे गाणं चित्रपटात नसण्याचं कारण ऐकून तर त्याहून जास्त आश्चर्य वाटेल . काय तर म्हणे गाणं म्हणताना पडद्यावरील वहिदा रहमानच्या डोळ्यातील हावभाव अश्लील वाटले म्हणून त्यावर त्याकाळच्या सेन्सर बोर्डने ऑब्जेक्शन घेतलं . म्हणजे मग हाच निकष सेन्सॉर बोर्डने जर आजच्या चित्रपटांना लावला तर आज ५ मिनिटांचा चित्रपट तरी पाहण्यापुरता उरेल का ही शंकाच आहे .
असेच ओ पी नय्यर ह्यांनी संगीत दिलेले पण चित्रपटात नसलेले दुसरे गाणे आहे १९६२ सालच्या अत्यंत गाजलेल्या “एक मुसाफिर एक हसीना” चित्रपटातले . हीरो होता देखणा जाॅय मुखर्जी आणि हीरोइन होती गोड नाजुक साधना जिचे आजही लाखों करोडो चाहते आहेत . आणि ते लोकप्रिय गाणं जे चित्रपटात नाही ते आहे ..
“ मैं प्यार का राही हूँ
तेरी जुल्फ के साए में
कुछ देर ठहर जाऊँ
तूम एक मुसफिर हो
कब छोड के चल दोगे
ये सोचके घबराऊँ ” ..
ह्या गाण्याचा तर आणखीनच वेगळा किस्सा आहे . ह्यातल्या 'घबराऊँ' ह्या शब्दाचा उच्चार म्हणे काही केल्या ओ पो नय्यरच्या पसंतीला येईना आणि म्हणून हे गाणं त्यांनीच चित्रपटात घेऊ दिलं नाही . आणि तरीही हे गाणं अफाट गाजलं. कारण 'घबराऊँ' हा शब्द म्हणताना आशा भोसलेने आपल्या सुरेल आवाजात जी काही गोड गिरकी घेतली आहे तीच ह्या गाण्याच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण आहे असं अनेक रासिकांचं म्हणणं आहे .
१९६४ साली आलेला “काश्मीर की कली” हा सुद्धा प्रचंड गाजलेला चित्रपट . गालाला गोड गोड खळी पडणारी शर्मिला टागोर आणि खोडकर राजबिंडा शम्मी कपूर . आपल्या लाजवाब संगीताने रसिकांना मदहोश करणारं ह्या चित्रपटातलं एक अतिशय रोमॅन्टीक गाणं म्हणजे
“बलमा खुली हवा में
महकी हुई फिजा में
दिल चाहता है मेरा
बहकना इधर उधर” ..
हो पण हेच गाणं चित्रपटात आपल्याला दिसत नाही . बसला ना धक्का ? आता हे गाणं नसण्याचं कारण विचाराल तर वरील वहिदा रेहमानचं “जाता कहाँ है दिवाने” ज्या कारणामुळे रीजेक्ट झालं त्याच्या उलट कारण इथे सांगितलं जातं . “जाता कहाँ है" मध्ये वहिदाच्या डोळ्यातील भाव सेन्साॅर बोर्डला जरा अति सूचक वाटलेले आणि “बलमा खुली हवा में" मध्ये मात्र “बहकना इधर उधर” ह्या शब्दावर दिग्दर्शकाला शर्मिला टागोर कडून चेहर्यावर जे हावभाव अपेक्षित होते ते तिला काही केल्या जमले नाहीत . म्हणून मग शेवटी अख्खं गाणंच चित्रपटातून छाटलं गेलं .
१९५८ सालच्या “रागिनी” चित्रपटातलं अतिशय सुरेख शास्त्रीय गीत म्हणजे
“छोटासा बालमा
अँखियन निंद चुरा ले गयो
रतियन निंद ना आये”
आणि १९६० सालच्या “मिट्टी मे सोना” मधलं
“ पूछो न हमें हम उनके लिये
क्या क्या नज़राने लाये हैं”
ही दोन्ही गाणी सुद्धा अशीच दुर्दैवी . गीतरचना, संगीत सारं काही हवं तसं जुळून आलेलं असतानाही आणि प्रचंड लोकप्रियता मिळूनही ह्या गाण्यांच्या नशीबात पडद्यावर येणं लिहिलं नव्हतं .
तर ही होती आपल्या सर्वाना परिचित असलेल्या आपल्याच आवडत्या सदाबहार गाण्यांची एक नवी वेगळी ओळख . अशी त्यांची आणखीही बरीच गाणी आहेत . पण वरची गाणी मात्र चित्रपटात नसल्याचं फार वाईट वाटतं . कारण ह्या नसलेल्या गाण्यांचा त्या त्या चित्रपटांच्या लोकप्रिय होण्यामागे फार मोठा वाटा आहे .
आणि हो लास्ट बट नाॅट द लिस्ट ओ पी आणि आशा भोसले ह्या जोडीचं आजवर सर्वात गाजलेलं अर्थपूर्ण गाणं जे प्रत्यक्षात "प्राण जाये पर वचन न जाये" (१९७४)
ह्या चित्रपटासाठी बनवलं गेलं होतं . ह्याचं सुद्धा चित्रपटासाठी चित्रीकरण झालेलंच नाही .
“चैन से हमको कभी
आपने जीने ना दिया
जहर भी चाहा अगर
पीना तो पीने ना दिया” ..
पण ह्या गाण्याबद्दल कळल्यावर वाटलं कि एका अर्थी बरंच झालं हे गाणं चित्रपटात नाही . कारण हे गाणं फक्त आणि फक्त ओ पी आणि आशा ह्यांचंच आहे . त्यांच्यामध्ये तिसऱ्या कोणाचीही ढवळाढवळ नको . त्यांच्या भावना , तो दर्द दुसर्या कुणातर्फे व्यक्त करायला पडदा सुद्धा असमर्थच ठरला असता . मात्र ह्या गाण्याचं आशा भोसलेवरंच चित्रीत झालेलं दुरदर्शन वरचं लाइव्ह चित्रीकरण मात्र आहे आणि तेच सर्वात समर्पक आहे असं मला तरी वाटतं. ( ह्या व्हिडियोची लिंक कमेंटमध्ये दिली आहे )
© नयना पिकळे

सोमवार, १ जानेवारी, २०२४

बाईपण भारी देवा - सिने विश्लेषण

 'बाईपणभारीदेवा' हा चित्रपट रिलीज व्हायच्या आधीच प्रचंड hype तयार झालेला आणि रिलीज होऊन 2-3 दिवसही झालेले नाहीत आणि तरी अनेकांनी ह्यावर उलट सुलट लेखही लिहून झालेत .

त्यामुळे मी परत काहीही नव्याने लिहिण्यासारखं नाहिये पण राहावत नाही म्हणून थोडं मनातलं.
काहीजणांचं म्हणणं आहे कि चित्रपटात सर्वांनी ओव्हरअॅक्टींग केलिये आणि प्रसंग अतिरंजित आहेत. तरीही एकच सांगावसं वाटतंय, हा चित्रपट अजिबात चुकवू नका.
कथा आहे सहा सख्ख्या बहिणींची. काळाच्या ओघात आपापल्या संसारात, कुटुंबाच्या जबाबदार्यांमध्ये गुंतलेल्या आणि एकमेकींपासून थोड्या दुरावलेल्या.
त्यांना एकत्र आणणारं सूत्र आहे मंगळागौर. बस बाकी पुढची धम्माल चित्रपटातच अनुभवण्यासारखी आहे.
सख्ख्या बहिणींमधील तेढ, रुसवे फुगवे, गैरसमज, जळूपणा, इगो आणि त्याचबरोबर तितकीच माया, समंजसपणा, ओढ हे सगळं सगळं नेहमीच्या आपल्या आयुष्यातलंच आहे.
त्यांचा एकमेकींबद्दलचा राग, द्वेष, तिरस्कार, आसुया दाखवणारे प्रसंगही अगदी खरेखुरे आणि पटणारे आहेत. आणि त्यांच्यातील तेढ सुटणारे प्रसंग ज्या कल्पकतेने दिग्दर्शित केलेत ते तर खूपच आवडले.
घराघरात दिसणारं तेच इथे पडद्यावर पाहायला मिळतं. पण अत्यंत प्रभावीपणे.
चित्रपट थेट ह्रदयाला भिडतो. चित्रपटाचे संवाद आणि दिग्दर्शन एक नंबर.
चित्रपटाच्या सुरुवातीला नियमानुसार इतर चित्रपटां प्रमाणेच disclaimer येतो कि ह्यातील पात्र व प्रसंग काल्पनिक असून ह्यांचा प्रत्यक्ष कोणाशीही संबंध नाही .
पण मला तरी ह्यातला प्रत्येक प्रसंग खराखुरा वाटला . आजवरच्या आयुष्यात ह्यातील प्रत्येक गोष्ट कमीजास्त प्रमाणात प्रत्यक्ष अनुभवलेली किंवा ऐकलेली आहे.
ह्यातील सगळीच पात्र आपल्या आजुबाजूला वावरणारी पात्र आहेत. ह्यतली अनेक पात्र मी माझ्या आयुष्यात पाहिलेली आहेत आणि ती चित्रपटातील कॅरेक्टर्सपेक्षाही जास्त विक्षिप्त आहेत ह्यात जराही अतिशयोक्ति नाही.
तेव्हा हा चित्रपट पाहाच. अजिबात चुकवू नका.
© नयना पिकळे

🌸🌺🌹 बसंत है आया रंगीला 🌷🌻🥀

  कडाक्याच्या थंडीत डोक्यापर्यंत पांघरूण घेऊन झोपलं असताना अचानक एके दिवशी पाहटे कोकिळेची कुहूकुहू ऐकून जाग येते आणि एका क्षणात मनावरची मरगळ...